चला जाणूया नदीला अभियानासाठी आराखडा व कार्यपद्धती तयार करावी – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

0
15

सोलापूर : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव अंतर्गत चला जाणूया नदीला या अभियानात सोलापूर जिल्ह्यातील पाच नद्यांचा समावेश आहे. जिल्हास्तरीय यंत्रणांनी या उपक्रमाचे महत्त्व ओळखावे. या अभियानासाठी आराखडा व कार्यपद्धती तयार करावी. त्यासाठी तालुकानिहाय गट तयार करावेत. नदीप्रहरी सदस्यांनी अपेक्षित कामांची यादी सादर करावी. हे अभियान लोकसहभाग व शासकीय यंत्रणांनी यशस्वी करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिल्या.

नियोजन भवन येथे आयोजित चला जाणूया नदीला या अभियानासंदर्भात जिल्हास्तरीय समितीची पहिली बैठक आज पार पडली. बैठकीच्या अध्यक्ष स्थानावरून ते बोलत होते. यावेळी सोलापूर पाटबंधारे विभागाच्या श्रीमती अलझेंडे , जिल्हा खनिकर्म अधिकारी दिव्या वर्मा, जिल्हा वरिष्ठ भूवैज्ञानिक विभागाचे डॉ. संजय कुलकर्णी , कृषि उपसंचालक श्री. मोरे ,माणगंगा नदी प्रकल्पाचे श्री. घोंगडे, भीमा नदी समन्वयक श्री. जोशी, कासाळगंगा प्रकल्प विभागाचे महेंद्र महाजन, यासह महाविद्यालय, महानगरपालिका आदींचे प्रतिनिधी, समन्वयक उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी समितीच्या सदस्यांची मते जाणून घेतली व आवश्यक सूचना केल्या.

जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर म्हणाले, सदस्यांनी त्यांना अपेक्षित कामांची यादी व त्यासाठी संभाव्य सहभागी यंत्रणांची यादी द्यावी. सदर कामे नियमित शासकीय योजना, जिल्हा नियोजन समितीचा निधी किंवा रोजगार हमी योजना आदिंमधून पार पाडता येतील. शासकीय यंत्रणा व लोकसहभागातून परिवर्तन घडू शकते. त्यामुळे या अभियानामध्ये शासकीय यंत्रणांबरोबरच जास्तीत जास्त लोकसहभाग घेता येईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे ते म्हणाले.

गेल्या काही वर्षात पूर किंवा दुष्काळ यासारख्या समस्या वारंवार जाणवत आहेत. या पार्श्वभूमीवर नदीला जाणून घेणे आणि तिच्या समस्याचा अभ्यास करून त्याची सोडवणूक करण्यासाठी मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव निमित्त 2 ऑक्टोबर पासून चला जाणूया नदीला या अभियानाखाली नदी संवाद यात्रेची सुरवात करण्यात आली असून तिचा समारोप 26 जानेवारी 2023 रोजी होणार आहे.