बीड: तुम्ही निवडणुकीत मला जिंकवलत तेव्हा इज्जत दिली. माझा पराभव झाल्यानंतर त्यापेक्षा जास्त इज्जत दिली. आता तुम्हा सर्वांना इज्जत देण्यासाठी मी प्रत्येक गावागावात, कानाकोपऱ्यात दौऱ्याला येणार आहे. आपल्याला आपला डाव खेळायचा का नाय, असे वक्तव्य भाजपच्या विधानपरिषदेतील आमदार पंकजा मुंडे यांनी केले. त्या शनिवारी भगवान भक्तीगडावर आयोजित करण्यात आलेल्या दसरा मेळाव्यात बोलत होत्या.
यावेळी पंकजा मुंडे यांनी जातीपातीचे राजकारण करणाऱ्यांवर जोरदार टीका केली. आपला कार्यक्रम हा अठरापगड जातीच्या लोकांचा कार्यक्रम आहे. आपला कार्यक्रम ऊस तोडणाऱ्या कोयत्यावर गोपीनाथ मुंडे यांचे नाव लिहणाऱ्यांचा आहे. मतदान केल्याशिवाय ऊस तोडायला जाऊ नका, असेही पंकजा मुंडे यांनी उपस्थितांना सांगितले.
जातीपातीच्या राजकारणावरुन पंकजा मुंडे संतापल्या
मी साताऱ्याला गेले होते. तेव्हा उदयनराजे भोसले यांनी मला घरात नेलं आणि माझ्या हाताने आरती केली, तेव्हा त्यांच्या वडिलांच्या बाजूला गोपीनाथ मुंडेंचा फोटो होता. मात्र, आज राज्यात काय स्थिती आहे? अशी विचारणा पंकजा मुंडे यांनी केली. एखाद्याच्या गाडीचा अपघात झाला तर चालकाचे जात विचारली जाते. चिमुकलीवर अत्याचार झाल्यास त्याची जात विचार जात विचारली जाते. ही वेळ पाहण्यासाठी आयुष्यातील 22 वर्षे घालवली का? असा संतप्त सवाल पंकजा मुंडे यांनी विचारला.
पंकजा मुंडेंचा मुलगा आर्यमानचं लाँचिंग
यावेळी पंकजा मुंडे यांनी आपला मुलगा आर्यमान याची ओळख उपस्थितांना करुन दिली. पंकजा मुंडे यांनी आपल्या मुलाला आवर्जून जवळ बोलावून घेतले आणि त्याची ओळख करुन देताना म्हटले की, हा माझा मुलगा आर्यमान, भगवान बाबांच्या दर्शनाला आलाय. मी माझ्या मुलाला सांगितलं की, मला तुझ्यापेक्षा ही जनता जास्त प्रिय आहे. माझ्यावर जीएसटीचा छापा पडला तेव्हा या लोकांनी 12 कोटी रुपये जमा केले. माझ्या निवडणुकीचा निकाल लागला तेव्हा माझ्या लेकरांनी जीव दिला. मीदेखील तुमच्यावर पोटच्या लेकरापेक्षा जास्त माया करते की नाही? तुम्ही घरच्यांपेक्षा जास्त जीव मला लावता, असे पंकजा मुंडे यांनी म्हटले. पंकजा मुंडे यांनी पहिल्यांदाच मुलगा आर्यमानला व्यासपीठावर आणल्याने आगामी काळात त्याचे राजकारणात लाँचिंग होणार का, अशी चर्चा रंगली आहे.