आई राजा उदो… उदोचा गजर…!
सोलापूर दि. ११- येथील कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात सुरू असलेल्या नवरात्रोत्सवनिमित्त परंपरेनुसार मसरे परिवाराच्यावतीने आई राजा उदो…उदो.. गजर करीत दहीहंडी मिरवणूक मोठ्या उत्साहात काढण्यात आली.
शुक्रवारी, उत्तर कसबा येथील मसरे यांच्या निवासस्थानापासून मंगलमय वातावरणात ही मिरवणूक निघाली. यावेळी मनपाचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, आमदार विजयकुमार देशमुख, ट्रस्टी वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ (तम्मा) मसरे , सुनील मसरे, अनिल मसरे, श्री सिद्धेश्वर बँकेचे माजी अध्यक्ष प्रकाश वाले, राजशेखर हिरेहब्बू, सुधीर थोबडे, सोमनाथ मेंगाणे, संदेश भोगडे, राजशेखर चडचणकर, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे आदीची प्रमुख उपस्थिती होती .
सवाद्य निघालेल्या या मिरवणुकीत शेकडो भाविक सहभागी झाले होते. ठिकठिकाणी भाविक भक्तीभावाने अभिषेकासाठी दहीदूध देत होते. गवळी समाजबांधव दहीहंडी डोक्यावर घेऊन या मिरवणुकीत सहभागी झाले होते. तत्पूर्वी विधिवत पूजा करण्यात आली. त्यानंतर मिरवणुकीस प्रारंभ झाला.
या मार्गाने निघाली मिरवणूक
ही मिरवणूक मसरे गल्ली येथून पुढे टिळक चौक, मधला मारुती, मंगळवार पेठ पोलीस चौकी, बलिदान चौक, रूपाभवानी चौकमार्गे वाजत गाजत ही मिरवणूक श्री रूपाभवानी मंदिरात आली.या ठिकाणी देवीला विधिवत दहीदूधाचा अभिषेक करण्यात आला.जय भवानी मंडळाच्यावतीने ढोल-ताशाच्या गजरात या मिरवणुकीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.
या मिरवणुकीदरम्यान आई राजा उदो...उदो..गजर करीत देवीच्या नावाचा जयजयकार करण्यात येत होता.. तसेच रात्री देवीचा महापूजेनंतर छबिना मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीतदेखील भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी झाले होते.