नागपूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं काँग्रेस पक्षानं 288 विधानसभा मतदारसंघात उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीनं आगामी विधानसभा निवडणूक लढू इच्छिणाऱ्या काँग्रेस पक्षातील उमेदवारांचे अर्ज मागविले आहेत. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीनं जिल्ह्यातील भंडारा, साकोली आणि तुमसर या तीन विधानसभा क्षेत्रासाठी निवडणूक लढू इच्छिणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविलेत. विशेष म्हणजे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सुद्धा स्वतःसाठी साकोली विधानसभा क्षेत्र मतदारसंघातून उमेदवारी मागितली आहे. त्यांनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या आदेशानुसार काँग्रेस पक्षाकडं अर्ज सादर केला आहे. त्यामुळे एकप्रकारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी विधानसभेसाठी शड्डू ठोकला असल्याचे बोलले जात आहे.
पक्षाकडं 20 हजारांचा डीडीसह अर्ज दाखल
साकोली विधानसभा मतदारसंघातून नाना पटोले यांचा एकमेव अर्ज भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीकडं प्राप्त झाला आहे. या अर्जासोबत नानांनी पक्षादेशाप्रमानं 20 हजार रुपयांचा डीडी पक्षाला दिला आहे. भंडारा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पवन वंजारी यांच्याकडं नाना पटोले यांचा अर्ज त्यांचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रतिनिधी आणि स्विय सहाय्यक राजू पालीवाल यांनी सादर केलाय. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. तर, भंडारा विधानसभेसाठी 11 तर, तुमसर विधानसभेसाठी 6 असा जिल्ह्यातील तीन विधानसभेसाठी 18 जणांनी काँग्रेस पक्षाकडं उमेदवारी मागितली आहे.