मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीसाठी दोघांनीही दंड थोपटलेले पाहायला मिळत आहेत. महायुतीच्या पाठोपाठ महाविकास आघाडीनेही आता राज्यभर सभा बैठका संवाद यात्रा सुरू करणार आहे. महाविकास आघाडी 16 ऑगस्ट ला प्रचाराचा नारळ फोडणार आहे तर महायुती 20 ऑगस्टला आपला प्रचार सुरू करणार आहे.
लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांकडे महाराष्ट्रसह संपूर्ण देशाच लक्ष लागले आहे. आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी युतीची धडपड सुरू आहे. तर सत्ताधारी युतीला सत्तेवरून खेचण्यासाठी महाविकास आघाडी एकही संधी सोडत नाही.जाणून घेऊया सत्ताधारी आणि विरोधकांची नेमकी रणनीती काय आहे?
महाविकास आघाडीची नेमकी काय रणनिती आहे?
विधानसभेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीची पहिली सभा मुंबईमध्ये 16 ऑगस्टला षण्मुखानंद हॉलमध्ये पार पडणार आहे. या सभेला शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले आणि महाविकास आघाडीचे सर्व महत्त्वाचे नेते आणि पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचाराच रणशिंग याच सभेतून महाविकास आघाडी फुकंणार आहे. त्यानंतर 20 ऑगस्टला काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बीकेसीत सभा पार पडणार आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाची शिवनेरीवरून आज पासून शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात झालेली आहे. तर उद्यापासून काँग्रेस पक्षाचे नेते मराठवाड्याच्या दौऱ्यावरती असून प्रभारी रमेश चन्नीथला हेही उपस्थित असणार आहेत. मराठवाड्यातील जागा वाटपांच्या चाचणीसह प्रचारांच्या छोट्या-मोठ्या सभा पार पडणार आहेत.