सोलापूर (शिवाजी सुरवसे) : ज्या चार हुतात्म्यांच्या नावावर सोलापूर देशात सर्वप्रथम स्वतंत्र झाले त्याच चार हुतात्म्यांना इंग्रजानी फासावर लटकविले. मल्लप्पा धनशेट्टी, श्रीकिसन सारडा , जगन्नाथ शिंदे, अब्दुल रसूल कुर्बान हुसेन या हुतात्मा यामुळे सोलापूरचा इतिहास गौरवशाली बनला आहे. केंद्रीय राज्यमंत्री देहूसिंग चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये आज चार हुतात्मावर टपाल तिकीट प्रकाशित करण्यात आले. मात्र त्या चार पुतळा परिसराचे काय हा प्रश्न अनुत्तरित आहे. विविध जाती धर्माच्या पुतळ्यावर महापालिका कोट्यवधी रुपये दरवर्षी खर्च करते मात्र चार पुतळा परिसर अतिक्रमण आणि घाणीच्या विळख्यात दररोजच अडकलेला असतो. सोलापूर महापालिकेने या चार पुतळ्यांना अजूनही शिक्षेत ठेवले आहे का असा प्रश्न हा परिसर पाहिल्यावर निर्माण होतो आज मंत्री येणार म्हणून या चार पुतळ्यांना फुलांनी सजविण्यात आले मात्र परिसर जसाच्या तसा आहे.