एमपीएससीच्या परीक्षेमुळे युवा महोत्सवाच्या तारखेत बदल..!

0
110

आता 9 ऑक्टोबर पासून सुरु होणार युवा महोत्सव!

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या युवा महोत्सवाच्या तारखेत एमपीएससीच्या परीक्षेमुळे बदल करण्यात आला आहे. त्यानुसार आता 9 ते 12 ऑक्टोबर 2022 यादरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात युवा महोत्सव होणार असल्याची माहिती कुलसचिव योगिनी घारे यांनी दिली.

विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून याआधी 7 ते 10 ऑक्टोबर 2022 या कालावधीत युवा महोत्सवाची तारीख निश्चित करण्यात आली होती. मात्र 8 ऑक्टोबर 2022 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून परीक्षा होणार असल्यामुळे दोन दिवस युवा महोत्सव पुढे ढकलण्यात आला आहे. त्यानुसार आता 9 ते 12 ऑक्टोबर 2022 यादरम्यान मंगळवेढा येथील दलित मित्र कदम गुरुजी विज्ञान महाविद्यालयात युवा महोत्सव होणार आहे. विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागाकडून कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली युवा महोत्सवाची तयारी केली जात आहे.

यजमान महाविद्यालयाच्या प्रशासनाकडून देखील युवा महोत्सवा संदर्भात जोरदार तयारी करण्यात येत आहे. त्याचबरोबर विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे हे युवा महोत्सव समितीच्या माध्यमातून नियोजन करीत आहेत. संलग्नित सर्व महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी युवा महोत्सवात सहभागी होण्यासाठी सर्व कला प्रकारांची तयारी सुरू करावी, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.