सिमडेगा, झारखंड, दि. ३० सप्टेंबर-
पुष्पुर येथील अलबर्ट एक्का स्टेडियमवर सुरू असलेल्या ३४व्या किशोर-किशोरी राष्ट्रीय अजिंक्यपद खो खो स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर व किशोरी संघाने उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.
झारखंड राज्य खो-खो असोसिएशनने आयोजित केलेल्या या स्पर्धेत महाराष्ट्राच्या किशोर संघाने साखळीतील त्रिपुराविरुद्धच्या पहिल्या सामन्यात एक डाव ३६ गुणांनी दणदणीत विजय मिळवला. शेवटच्या साखळी सामन्यात सामन्यात त्यांनी विदर्भचा एक डाव आणि २८ गुणांनी पराभव केला.
महाराष्ट्र संघाकडून खेळताना श्री दळवीने ३.०० मिनिट संरक्षण करत २ गडी बाद करीत अष्टपैलू खेळ केला. सुरेश वसावेने २.१० मी., २.३० मी. संरक्षण केले. भीमसेन वसावेने अष्टपैलू खेळ करताना नाबाद १.५० मी. संरक्षण करीत २ गडी बाद केले. सुरेश चव्हाणने ४ गडी टिपले.
किशोरी गटात महाराष्ट्राने तेलंगणा, दिल्ली, सिक्कीम आणि त्रिपुरावर दणदणीत विजय मिळवत गटात अव्वल स्थान पटकावले. साखळीतील शेवटच्या सामन्यात महाराष्ट्रच्या मुलींनी तेलंगणावर १ डाव आणि ४ गुणांनी विजय नोंदवला. सिद्धी तामखडेने दोन्ही डावात ४.१० मी. आणि ४.०० मी. संरक्षण करताना १ गडी बाद केला. तिच्या या अष्टपैलू खेळामुळे महाराष्ट्राचा विजय अगदी सोपा झाला. तिला सिद्धी भोसले १.३० मी., वेदिका तामखडे २.१० मी संरक्षणाची तर अपूर्वा वर्दे आणि प्रणिती जगदाळे प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ मिळाली.
असे होणार उपउपांत्यपूर्व फेरीचे सामने किशोर : महाराष्ट्र-उत्तर प्रदेश. किशोरी : महाराष्ट्र-गुजरात.