सलगच्या सुट्ट्यांमुळे महाबळेश्वर पर्यटकांनी बहरले; रस्त्यावर सर्वत्र ‘ट्राफिक जॅम’

0
33

सातारा; १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन आणि सलगच्या सुट्ट्यांमुळे सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेले महाबळेश्वर पर्यटकांनी सध्या बहरले आहे. पावसाची बरसात सोबतीला थंड वातावरण अन सर्वत्र पसरलेला हिरवागार निसर्ग याचा आस्वाद पर्यटक घेत आहेत.
जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील पर्यटकांचे फेव्हरेट डेस्टिनेशन असलेल्या महाबळेश्वर मध्ये पर्यटकांच्या गाडयांनी मात्र रस्त्यावर काही ठिकाणी ‘ट्राफिक जॅम’ दिसत आहे. सुट्ट्यांमुळे येथील रिसॉर्ट्स आणि लॉजिंग चालकांनी भरमसाठ दरवाढ केली आहे तर पर्यटकांनी आपली गैरसोय टाळण्यासाठी आधीच काही रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स लॉज बुक केले आहेत. सध्या सर्वत्र या भागामध्ये वर्षा पर्यटनाचा माहोल असल्याने येथील आजूबाजूच्या असणाऱ्या धबधब्यांवर पर्यटक गर्दी करत आहेत.
हिरव्यागार वनराईने महाबळेश्वर आणि पाचगणीचे रुपडे पालटले आहे सलग च्या सुट्ट्यांमुळे येथे पर्यटकांची चांगली रेलचेल आहे. डोंगर कपारीतून उंचावरून कोसळणारे जलप्रपात पर्यटकांचे आकर्षण ठरत आहेत. तर वेण्णालेक आणि येथील परिसराला दाट धुक्याच्या चादरीने लपेटले आहे या अशा रम्य वातावरणामध्ये पर्यटक वेण्णा लेक मध्ये बोटिंग रोमांचकारी अनुभव घेत आहेत. या ठिकाणी वेण्णालेक परिसरातील छोट्या मोठ्या उद्योगांना या मुळे चांगले दिवस आले आहेत.
महाबळेश्वर येथील मुख्य बाजारपेठ पर्यटकांच्या गर्दीने फुलली आहे उबदार स्वेटर ब्लॅंकेट आणि इतर खरेदी साठी बाजारपेठ सज्ज आहे. महाबळेश्वर परिसरात अजूनही पाऊस असून सर्वत्र हिरवाईने नटलेली वनराई पर्यटकांना खुणावत आहे.