शिवाजी सुरवसे / येस न्युज मराठी : दीड लाख कोटीचा वेदांत समूहाचा सेमीकंडक्टर प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. मात्र याचे सोलापूर कनेक्शन नक्की काय बरे?. काहीच नाही.. कारण आम्हाला उद्योग -बिद्योग काहीच नकोय. फक्त जयंती पुण्यतिथी आशा मध्येच आम्ही मिरवणुकामध्ये बेधुंद होतोय. आमचं पाणी पळवून नेलं काय आणि आमचे कोणतेच प्रकल्प झाले नाहीत तरीही आम्हाला याचे काहीच देणे घेणे वाटत नाही. सोलापूरकरांच्या भावना बोथट होऊ लागल्या आहेत आणि इथल्या विकासाला बधिरपणा आला आहे. त्यामुळेच जो- तो सोलापूर सोडायची भाषा करतोय. सोलापूरकरांसाठी आणि लोकप्रतिनिधींसाठी ही नक्कीच धोक्याची घंटा आहे. आंतरराष्ट्रीय बोरामणी विमानतळ… थरमॅक्स चा प्रकल्प… बाबा कल्याणी यांचा भारत फोर्ज चा कारखाना.. सोलापूरची विमान सेवा.. उजनी ते सोलापूर समांतर जलवाहिनी.. सोलापूर शहरातील एक हजार कोटी रुपयांचे दोन उड्डाणपूल… उजनी आणि हिप्परगा जलाशयाचा पर्यटनाच्या अँगलमधून विकास करणे..
जिल्ह्याचा धार्मिक टुरिझम चा दर्जा देणे .. या बातम्या वाचून सोलापूरकरांना आता वीट आला आहे.. आयटी पार्क उभारणे मोठे उद्योग आणणे या तर आमच्या कल्पनेच्या पलीकडील गोष्टी आहेत. त्यामुळे इथली लोकसंख्या स्थलांतरित झाली काय आणि नाही वाढली तरीपण कोणालाच फरक पडत नाही. आमच्या रक्तातच ‘निवांत’ आणि मला काय त्याचे देणे घेणे हे भिनले आहे. शेतीला विज मिळत नाही.. उजनीचे पाणी मिळत नाही तरीही सर्वाधिक साखर उत्पादन करणारा डाळिंब उत्पादन करणारा तसेच मेडिकल टुरिझम असणाऱ्या सोलापूर जिल्ह्याचा इतिहास सुवर्ण अक्षरांनी लिहून ठेवला आहे आपण असंच निवांत राहिलो तर वर्तमान बरा राहील मात्र सोलापूरचे भवितव्य अंधकारमय आहे हे निश्चित. याचा प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींनी आप आपल्या पद्धतीने विचार करावा एवढेच एस न्यूज मराठीचे सांगणे