आयपीएल : प्लेऑफचं गणित : ५ सामने, ३ जागा आणि ७ दावेदार

0
31

येस न्युज नेटवर्क : आयपीएल २०२२ स्पर्धेच्या लीग स्टेजचे आता केवळ 5 सामने शिल्लक आहेत. 65 सामने खेळून पूर्ण झाले असले तरी आतापर्यंत केवळ एकच प्लेऑफमध्ये जाणारा संघ समोर आला आहे. गुजरात टायटन्सने दमदार कामगिरी करत 13 पैकी 10 सामने जिंकत 20 गुणांसह प्लेऑफमध्ये स्थान मिळवलं आहे. तर दुसरीकडे चेन्नई आणि मुंबईचं आव्हान संपुष्टात आलं आहे. यांच्याशिवाय इतर सातही संघ प्लेऑफच्या शर्यतीत असून कोण पुढे, कोण मागे हे आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

सर्वात पुढे राजस्थान आणि लखनौ
राजस्थान आणि लखनौ संघ प्लेऑफच्या शर्यतीत सर्वात पुढे आहेत.दोन्ही संघानी प्रत्येकी 8-8 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांच्या खात्यात 16 गुण असून त्यांचा नेट-रन रेट पण चांगला आहे. त्यामुळे हे दोन्ही संघ त्यांचा उर्वरीत सामना जिंकल्यास पुढील फेरीत नक्कीच पोहोचतील. तसंच त्यांचा पराभव देखील झाला तरी त्यांचे पुढील फेरीत पोहचण्याचे चान्सेस अधिक आहेत. कारण इतर संघ त्यांच्यापासून पाठी आहेत.

चौथ्या स्थानासाठी दिल्ली आणि बंगळुरुत लढत
दिल्ली आणि बंगळुरु या दोन्ही संघानी आतापर्यंत 7-7 सामने जिंकले आहेत. प्लेऑफमध्ये चौथ्या स्थानासाठी त्यामुळेच हे दोन्ही संघ आघाडीवर आहेत.या दोघांपैकी एकही संघ शेवटचा सामना जिंकल्यास कोलकाता, हैदराबाद आणि पंजाब यांचे पुढील फेरीचे चान्सेस संपूर्णपणे संपतील. दिल्ली आणि बंगळुरु हे दोन्ही संघ शेवटचा सामना पराभूत झाल्यास इतर संघाना संधी मिळू शकते.

दिल्ली आणि बंगळुरु पराभूत झाल्यास चुरस वाढेल
दिल्ली आणि बंगळुरु या संघानी जर आपला शेवटचा सामना गमावला आणि कोलकाता, पंजाब किंवा हैदराबादने त्यांचा शेवटचा सामना जिंकल्यास पुढील फेरीत पोहोचण्याची चुरस आणखी वाढेल. अशावेळी संघाच्या नेट-रनरेटवर सारं गणित अवलंबून असेल.