येस न्युज मराठी नेटवर्क : छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय रिअॅलिटी शो ‘इंडियन आयडल’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. यंदाचा सीझन हा प्रदर्शित होण्यापूर्वीच चर्चेत आहे. या चर्चा सोनी टीव्हीने इंडियन आयडलचा प्रोमो शेअर केल्यामुळे सुरु झाल्या आहेत. प्रोमोमध्ये इंडियन आयडलमध्ये एक स्पर्धक आला आहे ज्याने त्याच सेटवर साफसफाई करण्याचे काम केले होते. त्याचा आवाज, गाणे ऐकून परिक्षक भावूक झाले आहेत.
नुकताच सोनी टीव्हीने त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ‘इंडियन आयडल’चा प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमो व्हिडीओमध्ये युवराज हा स्पर्धक मराठी गाणे गाताना दिसत आहे. त्याचा आवाज ऐकून परिक्षक विशाल दादलानी, नेहा कक्कड आणि हिमेश रेशमिया हे भावूक झाले आहेत.
मराठमोळ्या युवराजने गाणे गायल्यानंतर सांगितले की तो सेटवर साफसफाईचे काम करत होता. सेटवर साफसफाई करत असताना तो गाणे गायला शिकला. जेव्हा परिक्षक स्पर्धकांना त्यांच्या चुका सांगयचे तेव्हा युवराज त्याकडे लक्ष द्यायचा आणि त्या चुका त्याच्याकडून होणार नाहीत याची काळजी घ्यायचा. युवराजचे असे बोलणे ऐकून परिक्षक भावूक झाले.