सोलापूर: पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाचे संचालक प्रा. डॉ. बाळकृष्ण लोखंडे यांना क्वीन्सलंड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजी ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया येथे संपन्न होणाऱ्या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये निमंत्रित व्याख्याता म्हणून व्याख्यान देण्याचा बहुमान मिळाला आहे. ही आंतरराष्ट्रीय परिषद 25 ते 27 सप्टेंबर 2024 रोजी संपन्न होणार आहे. या आंतरराष्ट्रीय परिषदेमध्ये अनेक देशातील नामवंत संशोधकांचा सहभाग असणार आहे.
या आंतरराष्ट्रीय परिषदेचा विषय “प्रगत साहित्य
संश्लेषण वैशिष्ट्यीकरण आणि अनुप्रयोग” असा आहे. ऊर्जा साठवणूक आणि सुपरकपॅसिटर या विषयावरील सखोल संशोधन या मुळे प्रा. लोखंडे यांना हा बहुमान लाभला आहे. आंतरराष्ट्रीय परिषदेतील या सहभागासाठी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर सर, प्र कुलगुरू प्रा.लक्ष्मीकांत दामा , कुलसचिव योगिनी घारे तसेच सर्व सहकारी यांच्याकडून प्रा.लोखंडे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.