राज्य शासनाकडून पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात साठी 474.13 कोटीची तरतूद मंजूर
सोलापूर :- राज्य शासनाने सन 2014 मध्ये श्री क्षेत्र देहू, आळंदी, भंडारा डोंगर, नेवासा व पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी एक हजार 94.89 कोटीचा आराखडा मंजूर केला; त्याअंतर्गत पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील शंभर कामांसाठी 474 कोटी 13 लाखांची तरतूद करण्यात आलेली होती. या अंतर्गत पूर्ण झालेली 51 कामे वगळता अन्य प्रस्तावित असलेली कामे आषाढी यात्रेपूर्वी पूर्ण करून पंढरपूर येथे येणाऱ्या भाविकांसाठी दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी संबंधित यंत्रणांनी अधिक गतीने काम करावे, असे निर्देश सार्वजनिक बांधकाम, वने, पशुसंवर्धन व दुग्धविकास, मृद व जलसंधारण व सामान्य प्रशासन राज्यमंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.
नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीत पालकमंत्री भरणे बोलत होते. यावेळी आमदार बबनदादा शिंदे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, महापालिका आयुक्त पि. शिवशंकर, अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, जिल्हा नियोजन अधिकारी सर्जेराव दराडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री भरणे पुढे म्हणाले की, पुढील महिन्यात आषाढी यात्रेनिमित्त लाखोच्या संख्येने भाविक पंढरपूर येथे येतात. तर त्या सर्व भाविकांना दर्जेदार सुविधा कशा पद्धतीने मिळतील यासाठी प्रत्येकाने अत्यंत जबाबदारीने काम केले पाहिजे. या विकास कामात काही अडचणी असतील तर संबंधित विभाग प्रमुख यांनी थेट संपर्क साधावा. त्या अडचणी सोडवण्यासाठी पाठपुरावा करण्यात येईल असे त्यांनी सांगितले.
यावेळी पालकमंत्री भरणे यांनी पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार जी 100 कामे प्रस्तावित केलेली आहेत, त्या कामांचा सविस्तर आढावा घेतला. तसेच त्यातील पूर्ण झालेल्या 51 कामांची माहिती घेऊन प्रगतीपथावरील 10 कामांचा सविस्तर आढावा घेऊन ती कामे तात्काळ मार्गी लावावीत. तसेच पोलीस विभागाने आषाढी यात्रेदरम्यान लाखोच्या संख्येने येणारे भाविक यांच्यावर नियंत्रण ठेवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पंढरपूर शहरात आवश्यक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबतची कार्यवाही पूर्ण करावी, असेही त्यांनी निर्देशित केले.
तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार पंढरपूर शहरात 13 ठिकाणी 1472 इतकी सुलभ शौचालये बांधून वापरण्यासाठी उपलब्ध झालेली आहेत. तर दहा ठिकाणी सुलभ शौचालय बांधण्याचे काम प्रगतिपथावर आहे या सर्व कामासाठी 67 कोटी 60 कोटीचा निधी मंजूर आहे. पुरुष शौचालय 752 व स्त्री शौचालय 720 असल्याची माहिती जिल्हाधिकारी शंभरकर यांनी देऊन प्रगतीपथावरील इतर कामे ही संबंधित यंत्रणांकडून त्वरित पूर्ण करून घेण्यात येतील व यात्रे दरम्यान येणाऱ्या भाविकांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध करण्यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रारंभी जिल्हा नियोजन अधिकारी दराडे यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्या नुसार 474 कोटी 13 लाखाचा निधी सन 2014 मध्ये राज्यस्तरीय शिखर समितीने मंजूर केलेला असून त्यानुसार पंढरपूर तीर्थक्षेत्र विकासासाठी शंभर कामे प्रस्तावित केलेली होती. त्यातील 51 कामे पूर्ण झाली असून या कामांमध्ये पंढरपूर शहरातील अंतर्गत रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणावर आहेत. तर यातील दहा कामे प्रगतीपथावर असून ते वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. त्याप्रमाणेच आराखड्यात सुरुवातीला समाविष्ट केलेली 31 कामे नंतर गरज नसल्याने वगळण्यात आलेली असून आठ कामे जागेची अडचण निर्माण झाल्याने प्रलंबित आहेत अशी माहिती त्यांनी दिली.