प्रतिनिधी | सोलापूर
मातृभूमी गान से गुंजता रहे गगण…. भारत माता की जय, वंदे मातरम, जय जय श्रीराम अशा घोषणांद्वारे मंद्रूप येथे हिंदू
नववर्षांच्या निमित्ताने मोठी शोभायात्रा काढण्यात आली. केळी, नारळांच्या फांद्यांनी सजवलेल्या बैल गाडीमध्ये भारत मातेची प्रतिमा ठेवून गावातील मुख्य रस्त्यावरून सकल हिंदू समाजातर्फे मिरवणूक काढण्यात आली.


गुढी पाडवा निमित्ताने सायंकाळी पाच वाजता ग्रामदैवत मळसिद्ध महाराज मंदिर येथून मिरवणुकीस सुरवात झाली. पारंपारिक वेशभूषेमध्ये युवक सायकल व मोटार सायकल घेऊन शोभायात्रेत सहभागी होते. राष्ट्रभक्ती गीत म्हणत मुख्य रस्त्यावरून शोभायात्रा निघाली होती. गावकऱ्यांनी फुलांची मुक्त उधळण करीत शोभायात्रेचे स्वागत केले. शोभा यात्रासाठी गुंडू मायनाळे, अप्पाशा जेऊरकर, चिदा नांदुरे, सिद्धू ख्याडे यांनी स्वत: पुढाकार घेऊन बैलगाडी सजवून आणल्या होत्या. रविशंकर म्हेत्रे, अभिषेक म्हेत्रे, विनायक बिराजदार, चिदानंद दुधनी, रामचंद्र राजबिंदले, अविनाश कोळी यांच्यासह युवकांनी विशेष पुढाकार घेतला होता.


कुटुंब व्यवस्था सक्षम करा : हत्ताळे
श्री मळसिद्ध मंदिरात परतल्यानंतर विवेकानंद केंद्र कन्याकुमारीचे पश्चिम महाराष्ट्र विभागाचे युवा प्रमुख अप्पासाहेब हत्ताळे यांचे व्याख्यान झाले. आपली कुटुंबव्यवस्था अधिक सक्षम व्हावी. सर्वांनी एकत्रित जेवण करणे, सात्विक आहार, सकारात्मक विषयांवर कुटुंबामध्ये चर्चा करावी. घरातील लहान मुला-मुलींना सनातन संस्कृती, संस्काराची आेळख करून देण्यासह प्रत्येक धार्मिक उपक्रमांमध्ये सहभागी करून घ्यावे. परिसरातील मठ, मंदिरांमध्ये आठवड्यातून किमान दोनदा सर्वांनी एकत्रीत येऊन भजन, किर्तन, शरण साहित्यांबाबत सत्संग करावा, असे आवाहन हत्ताळे यांनी केले.