बुधवारपासून व्याख्यानमालेचे आयोजन
सोलापूर – सहकारतपस्वी, माजी आमदार कै. ब्रह्मदेवदादा माने यांच्या २२ व्या स्मृतिदिनानिमित्त ३ ते ६ सप्टेंबरदरम्यान विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून याअंतर्गत मंगळवार, ३ सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता कुमठे येथील एसपीएम पॉलिटेक्निक कॉलेजच्या मैदानावर अभिवादन सभा व याचठिकाणी बुधवार, ४ सप्टेंबरपासून तीन दिवस
व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती संस्थेचे मुख्य विश्वस्त तथा माजी नगरसेवक जयकुमार माने यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभिवादन सभेच्या अध्यक्षस्थानी सोलापूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष बळीराम साठे हे असणार आहेत. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
बुधवार, ४ सप्टेंबरपासून दररोज सकाळी १० वाजता
व्याख्यानमालेस प्रारंभ होणार असून पहिले पुष्प ज्येष्ठ निरुपणकार विवेक घळसासी हे गुंफणार आहेत. ‘पालकत्व इंद्रधनुष्य नव्हे, शिवधनुष्य’ असा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. गुरूवार, ५ सप्टेंबर रोजी शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख हे ‘आयुष्य घडविताना’ या विषयावर दुसरे पुष्प गुंफणार आहेत. यावेळी क्रेडाई इंडियाचे उपाध्यक्ष सुनील फुरडे हे अध्यक्षस्थानी राहणार आहेत. शुक्रवार, ६ सप्टेंबर रोजी ‘एचआर कॉन्क्लेव्ह २०२४’ चे आयोजन केले असून यामध्ये किर्लोस्कर फेरसचे हृषीकेश कुलकर्णी, लक्ष्मी हायड्रोलिक्सचे भारत वेदपाठक तसेच प्रिसीजनचे परितोष खेर हे संवाद साधणार आहेत. अभिवादन सभा व व्याख्यानमालेस उपस्थित राहावे, असे आवाहन माने यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेस प्रा. ज्ञानेश्वर जाधव, प्रा. मनोज कुलकर्णी, प्रा. संजय जाधव उपस्थित होते.