पंतप्रधान मोदींसह दिग्गजांकडून श्रद्धांजली
येस न्युज मराठी नेटवर्क : प्रसिद्ध कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांचं निधन झालं असून वयाच्या 83 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पद्मविभूषण पुरस्कार विजेते बिरजू महाराज (83) यांनी रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री अखेरचा श्वास घेतला. त्यांचे नातू स्वरांश मिश्रा यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे याबाबत माहिती दिली. गायक अदनान सामीनंही सोशल मीडिया पोस्टद्वारे त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
अदनान सामीनं सोशल मीडियावर लिहिलं आहे की, “महान कथ्थक नर्तक पंडित बिरजू महाराज यांच्या निधनाच्या बातमीनं खूप दुःख झालं. आज आपण कलेच्या क्षेत्रातील एक अनोखी संस्था गमावली आहे. त्यांनी आपल्या प्रतिभेनं अनेक पिढ्यांना प्रभावित केलं आहे.
लखनौ घराण्यातील बिरजू महाराज यांचा जन्म 4 फेब्रुवारी 1938 रोजी लखनौ येथे झाला. त्यांचं खरे नाव पंडित बृजमोहन मिश्रा होतं. कथ्थक नर्तक असण्यासोबतच ते शास्त्रीय गायकही होते. बिरजू महाराज यांचे वडील आणि गुरु आच्छान महाराज, काका शंभू महाराज आणि लच्छू महाराज हे देखील प्रसिद्ध कथ्थक नर्तक होते.