कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, परत या; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन

0
36

येस न्युज नेटवर्क : राज्यातील सत्तासंघर्ष दिवसेंदिवस आणखी गडद होत चाललं आहे. शिवसेनेतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आल्यामुळे महाविकास आघाडी सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं आहे. शिवसेनेचे प्रबळ नेते आणि महाविकास आघाडीतील मंत्री एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह बंड केला. या सर्वांना आसाममधील गुवाहाटीतील रॅडिसन हॉटेलमध्ये मुक्काम ठोकला आहे. अशातच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडून सर्व बंडखोर आमदारांना वारंवार आवाहन केलं जात आहे. पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांनी सर्व बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.

“आपण गेल्या काही दिवसांपासून गुवाहाटी येथे अडकून पडलेले आहात. आपल्या बाबत रोज नवीन माहिती समोर येत आहे, आपल्यातील बरेच संपर्कातही आहेत. आपण आजही मनानं शिवसेनेत आहात. आपल्यापैकी काही आमदारांच्या कुटुंबातील सदस्यांनी देखील संपर्क साधून आपल्या मनातील भावना मला कळवल्या आहेत. आपल्या भावनांचा मी शिवसेनेचा कुटुंबप्रमुख म्हणून आदर करतो. कुटुंबप्रमुख म्हणून तुम्हाला मनापासून सांगतो, अजुनही वेळ गेलेली नाही, माझं आपल्याला सगळ्यांना आवाहन आहे, आपण या माझ्यासमोर बसा, शिवसैनिकांच्या आणि जनतेच्या मनातील संभ्रम दूर करा, यातून निश्चित मार्ग निघेल.”, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना आवाहन केलं आहे.