संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊतांना ईडीचं समन्स

0
9

मुंबई : शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना अंमलबजावणी संचालनालयाने समन्स बजावलं आहे. पत्राचाळ प्रकरणी वर्षा राऊत यांना ईडीचं समन्स बजावले आहे. वर्षा राऊत यांना चौकशीसाठी उद्या सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याआधी जानेवारी महिन्यात वर्षा राऊत चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर झाल्या होत्या. यावेळी ईडी अधिकाऱ्यांनी त्यांची जवळपास साडेतीन ते चार तास चौकशी करण्यात आली होती.

शिवसेना खासदार संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडीने कोठडी सुनावली आहे. राऊतांच्या पत्नी वर्षा यांच्या खात्यावरुन झालेल्या व्यवहाराबाबत राऊत माहिती देत नसल्याचा आरोप ईडीनं कोर्टात केला. ज्यांच्याशी व्यवहार झालाय त्यांना चौकशीसाठी बोलवणार असल्याचं ईडीनं पीएमएलए कोर्टाला सांगितलं. दरम्यान 1 कोटी 17 लाखाच्या व्यवहाराबाबत तपास सुरु असून यापूर्वी 1 कोटी 6 लाखांच्या व्यवहराची माहिती मिळाल्याचं ईडीनं कोर्टात सांगितलं. या व्यवहाराची चौकशी करण्यासाठी ईडीने समन्स बजावल्याची माहिती समोर आली आहे.