नाशिक पदवीधर मतदारसंघामध्ये पुन्हा भूकंप होणार ? सत्यजित तांबेंच्या भाजप चर्चाना उधाण ?

0
17
  • विधान परिषद निवडणूक जाहीर झाल्यापासून नाशिक पदवीधरमध्ये मोठ्या प्रमाणात घडामोडी घडत आहेत. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे यांची उमेदवारी जाहीर करुनही त्यांनी उमेदवारी अर्ज भरला नाही. तर सत्यजीत तांबे यांनी काँग्रेसला झटका देत अपक्ष अर्ज भरला. यामुळे नाशिक पदवीधर मतदार संघाची चर्चा राज्यभरात होत आहे. अशातच पुन्हा या मतदार संघात भूकंप होणार असल्याची चर्चा आहे.
  • सत्यजित तांबे यांचा दोन-चार दिवसांत भाजपमध्ये प्रवेश होणार असल्याची माहिती मिळत आहे. राज्यातील नेत्यांनी केंद्रीय नेतृत्वाला त्याबाबत विनंती केली असून लवकरच हा पक्षप्रवेश होईल, असे भाजपच्या सुत्रांनी स्पष्ट केले आहे. काँग्रेसने डॉ. सुधीर तांबे आणि सत्यजीत यांना पक्षातून निलंबित केले आहे. त्यामुळे त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे पुन्हा एकदा सत्यजीत तांबे यांचे मामा आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांचे टेन्शन वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
  • दरम्यान, सत्यजीत यांनी अपक्ष अर्ज भरल्यामुळे महाविकास आघाडीने शुभांगी पाटील यांना पाठिंबा दिला आहे. त्यामुळे आता सत्यजीत यांना भाजपचा पाठिंबा हवा असल्यास, भाजपमध्ये प्रवेश करावा, अशी अट घालण्यात आली आहे. सुधीर तांबे यांचा मात्र सध्या तरी भाजपमध्ये प्रवेश होणार नसल्याची माहिती आहे.
  • डॉ. तांबे यांनी नाशिक पदवीधर मतदारसंघाची चांगली बांधणी केली आहे. मात्र, सत्यजित हे भाजपमध्ये गेल्यास काँग्रेसच्या मतदारांची मते मिळतील का, हा प्रश्न आहे, सत्यजित यांचा पराभव करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. सत्यजित तांबे यांना पाठिंबा हवा असल्यास पक्षात प्रवेश करण्याचा पर्याय भाजपने त्यांना दिला आहे. तेही त्यास अनुकूल असून लवकरच तांबे यांचा भाजपप्रवेश होईल, असे सांगितले जात आहे.
  • भाजपने नाशिक मतदार संघात उमेदवार दिलेला नाही. तसेच ज्या उमेदवारांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. त्याचे अर्ज मागे घेतले आहेत. सध्या भाजपने सत्यजीत तांबे यांना जाहीर पाठिंबा दिला नसला तरी त्यांचा प्रचार सुरु केला असल्याचे सांगितले जात आहे. भाजप आपली ताकद सत्यजीत यांच्या पाठीशी उभी करत आहे. त्यामुळे त्याचा लवकरच भाजप प्रवेश होईल, असे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.