सोलापूर, दि.4 : गावठाणातील जमिनींचे ड्रोनद्वारे भूमापन (मोजणी) करण्यास सर्व्हे ऑफ इंडिया यांच्यातर्फे मान्यता मिळाली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील 23 गावांच्या गावठाणांचे 5 मार्च 2021 पासून ड्रोनद्वारे भूमापन होणार असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख हेमंत सानप यांनी दिली.
ड्रोनद्वारे गावठाणांचे भूमापन हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून याचा ग्रामस्थांना फायदा होणार आहे. उत्तर सोलापूर तालुक्यातील पाथरी, नंदूर, बेलाटी, तेलगाव, तरटगाव, भोगाव, शिवणी, भागाईचीवाडी, दारफळ गावडी, बाणेगाव, खेड, एकरूख, इंचगाव, गुळवंची, पडसाळी, वांगी, साखरेवाडी, तळेहिप्परगा, हगलूर, समशापूर, होनसळ, राळेरास आणि सेवालालनगर याठिकाणी 5 मार्चपासून जमिनींचे मोजमाप होणार आहे.
सर्व ग्रामस्थांनी आपल्या मिळकतीचे सीमांकन ग्रामसेवक, भूकरमापकाच्या सहाय्याने चुना पावडरने वेळेवर करून घ्यावे. सार्वजनिक मिळकती, शासन मिळकती विशेषत: रस्त्याच्या हद्दीचे संरक्षण होण्यासाठी ग्रामविकास अधिकारी, भूमी अभिलेख अधिकारी/कर्मचारी यांना योग्य माहिती पुरवावी, असे आवाहन सानप यांनी केले आहे.
ग्रामस्थांनी करावयाची कामे
· ग्रामसभेत उपस्थित राहून गावठाण भूमापनाचे महत्व, फायदे आणि कार्यपद्धती जाणून घ्यावी.
· ग्रामपंचायतीच्या अभिलेखामध्ये स्वत:च्या मिळकतीसंबंधी वारस नोंदी, इतर कायदेशीर
हस्तांतरणाच्या नोंदी अद्ययावत करून घ्याव्यात.
· ग्रामसेवकाला भ्रमणध्वनी आणि पत्ते द्यावेत.
· शेजारी, नातेवाईक, मित्र गावात राहत नसतील तर त्यांना भूमापनाची माहिती द्यावी. त्यांचेही फोन
आणि पत्ते असल्यास उपलब्ध करून द्यावेत.
· ड्रोनद्वारे भूमापनाच्या कामाला प्रारंभ करण्यापूर्वी सीमांकन करावे, सीमांकनाबाबत वाद असल्यास
आपल्या हद्दी सीमांकित करून घेऊन ग्रामसेवक, भूकरमापक किंवा भूमापन अधिकारी यांच्या निदर्शनाला आणून द्यावी.
· सार्वजनिक, शासकीय, ग्रामपंचायतीच्या मालमत्तावर कोणी हक्क सांगत असतील तर त्याची
माहिती द्यावी.
· मालकी हक्काच्या चौकशीवेळी चौकशी अधिकाऱ्यासमोर पुराव्याची कागदपत्रे सादर करावीत.
· दिवाणी न्यायालये, प्राधीकरण, न्यायाधीशासमोरील दावे, अर्ज, अपिल याची माहिती द्यावी.
ग्रामस्थांना होणारे फायदे
· शासनाच्या मालकीच्या मिळकतींचे संरक्षण होईल.
· गावातील घरे, रस्ते, शासनाच्या/ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांच्या सीमा आणि क्षेत्र
निश्चित होण्यास मदत होर्ईल. मिळकतीचा नकाशा तयार होईल.
· कायदेशीर हक्काचा अधिकारी अभिलेख मिळकत पत्रिका (प्रापर्टी कार्ड) स्वरूपात तयार होईल.
· ग्रामस्थांच्या नागरी हक्काचे संवर्धन होईल.
· मिळकत पत्रिका तयार झाल्यामुळे घरावर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल.
· मिळकतींना बाजारपेठेमध्ये तरलता येऊन गावांची आर्थिक पत उंचावेल.
· गावठाण भूमापनाची कार्यपद्धती पारदर्शकपणे राबविली जाणार असून ग्रामस्थांना अभिलेख सहज
उपलब्ध होतील.
· प्रशासकीय नियोजनासाठी गावठाण भूमापन नकाशे उपलब्ध होतील.
· ग्रामपंचायतीच्या उत्पन्नाचे स्त्रोत निश्चित होतील.