स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अतुलनीय त्यागाचा….

0
44

डॉ. श्रीकांत येळेगावकर : क्रांती दिनानिमित्त कॉलेज ऑफ फार्मसी येथे व्याख्यान
सोलापूर : देशाला स्वातंत्र्य हे स्वातंत्र्यवीरांच्या त्यागातून अन् बलिदानातून मिळालेले आहे. स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास अतुलनीय त्यागाचा आहे. देशाचे स्वातंत्र अबाधित ठेवणे ही केवळ पंतप्रधानांचीच नव्हे तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. आज प्रत्येकाने सद्सद्विवेक बुद्धी जागरूक ठेवून आचरण केले पाहिजे, असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते प्रा.डॉ. श्रीकांत येळेगावकर यांनी केले.


सहकार महर्षी वि.गु. शिवदारे स्मृती समारोहामध्ये बुधवारी (दि. 9) कॉलेज ऑफ फार्मसी येथे व्याख्यानात ते बोलत होते. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया, रोटरी क्लब ऑफ सोलापूर आणि कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने हे क्रांतीदिनाचे औचित्य साधून हे व्याख्यान पार पडले. व्यासपीठावर श्री स्वामी समर्थ सहकारी सुतगिरणीचे चेअरमन राजशेखर शिवदारे, प्राचार्य डॉ. आर.वाय. पाटील, रोटरी क्लब ऑफ सोलापूरच्या अध्यक्षा डॉ. ज्योती चिडगुपकर, दक्षिण सोलापूर तालुका शिक्षण मंडळाचे विश्वस्त बी.व्ही. शेटे, डॉ. भरत मुळे, डॉ. राजीव प्रधान उपस्थित होते. यावेळी डॉ. येळेगावकर यांनी स्वातंत्र्य चळवळीतील सोलापूरचे योगदान विशद केले. स्वातंत्र्यसैनिक मल्लप्पा धनशेट्टी, कुर्बान हुसेन, जगन्नाथ शिंदे व किसन सारडा यांचे बलिदान सोलापूरच्या इतिहासात अजरामर आहे, असे सांगत मार्शल लॉ व तत्कालीन परिस्थितीचा जाज्ज्वल्य इतिहास त्यांनी विद्यार्थ्यांसमोर उलगडला.

सूत्रसंचालन दिव्या धावणे हिने केले तर आभार अवंतिका मैली हिने मानले. कार्यक्रमास डॉ. जयेश पटेल, डॉ. बिराजदार, श्री. कोठारी, सोलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेचे चेअरमन प्रकाश वाले, व्हाईस चेअरमन नरेंद्र गंभिरे, महादेव बिराजदार, बाळासाहेब मुस्तारे, लायन्स क्लबचे अध्यक्ष अमोल गवसणे, सचिव मंजुनाथ दर्गोपाटील, पॉलिटेक्निकचे प्राचार्य डॉ. जी.के. कापसे, शिवदारे कॉलेजचे प्राचार्य डॉ. डी.एस. सुत्रावे, युनिक इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या पूजा बाजपई यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.

378 विद्यार्थिनींची हिमोग्लोबिन तपासणी
व्याख्यानानंतर डॉ. भरत मुळे यांनी मनुष्याच्या शरीरातील हिमोग्लोबीनचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन केले. हिमोग्लोबीनमुळे ऑक्सिजन हा फुफ्फुसाद्वारे प्रत्येक पेशीत पोहोचला जातो. हिमोग्लोबीनचे प्रमाण महिलांमध्ये 12 ते 16 तर, पुरुषांमध्ये 14 ते 18 असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबीन प्रमाण शरीरात चांगले असल्यास उत्तम आरोग्य लाभते, असेही ते म्हणाले. त्यानंतर विद्यार्थी आरोग्य जनजागरण उपक्रमांतर्गत विद्यार्थिनींची हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. यामध्ये एकूण 378 विद्यार्थिनींनी सहभाग नोंदविला होता.