सोलापूर : ज्ञानेश्वरी हे आत्मानंदाचे तत्त्वज्ञान असल्याचे अयोध्या येथील राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी मंगळवारी स्पष्ट केले.’ साई सुपर मार्केट’च्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित ज्ञानेश्वरी भावकथा या विषयावरील सप्ताहात ते बोलत होते.k
भगवद्गीतेला महाभारतातील कमळ म्हणतात. या कमळातील सुगंधित पराग म्हणजे महाभारत असे ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, असे सांगून स्वामी गोविंददेव गिरीजी म्हणाले की, आरशात आपल्याला दिसते ते आत्मरूप नसते. आत्मरूपाचा शोध घ्यायचा आहे, मी कोण आहे याचा वेध घेण्यासाठी ज्ञानेश्वरी अभ्यासायला हवी असेही त्यांनी सांगितले. आत्मरंगातल्या आत्मतत्त्वाला माऊली प्रणाम करतात आणि म्हणूनच ‘ओम नमोजी आद्या, वेद प्रतिपाद्या’ असे ज्ञानेश्वरीच्या सुरुवातीलाच सांगतात. ऋषी व आचार्य देखील नेहमी सांगत असतात की, स्मृति- श्रुती- पुराणांनी जे सांगितले आहे, तेच आम्ही वेगळ्या पद्धतीने सांगत आहोत. रमण महर्षी यांनी को$हम या एका शब्दाचा अर्थ कळावा म्हणून पूर्ण आयुष्य खर्ची घातले, असेही स्वामींनी स्पष्ट केले. माऊलींनी वांग्मय गणेश मूर्ती असल्याचे म्हटले आहे . वेदांतशास्त्राला गणपतीच्या हातातला मोदक असल्याची उपमा माऊलींनी दिली आहे.
ज्ञानेश्वरी म्हणजे भगवद्गीतेचे भाष्य आहे, ही गोष्ट सत्य आहे. परंतु तो केवळ टीकाग्रंथ नाही तर ज्ञानेश्वरीत अनेक बाहेरच्या गोष्टीही सांगितल्या आहेत , असे विवेचन स्वामीजींनी केले. ज्ञानेश्वरी मध्ये २२ ठिकाणी ही कथा असल्याचे श्री ज्ञानेश्वरांनीच म्हटले असल्याचे सांगून स्वामीजी म्हणाले की, ज्ञानेश्वरी या अद्वितीय आणि अतुलनीय ग्रंथाचा भावार्थ लक्षात घेणे आवश्यक आहे.
चार पुरुषार्थ चार आश्रम चार वर्ण आणि चार साधने ( ज्ञान, कर्म , योग आणि भक्ती ) अशा सोळा स्तंभांवर आपली संस्कृती उभी असल्याचे स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी स्पष्ट केले. ज्ञानेश्वरी ही अति हळुवारपणे आणि कोमल मनाने ऐकायला हवी असेही त्यांनी सांगितले. चकोर पक्षाची पिल्ले ज्याप्रमाणे पौर्णिमेच्या चंद्राचे अमृत प्राशन करतात तसे आपले मन ज्ञानेश्वरी समजावून घेताना कोमल असायला हवे, असेही स्वामीजींनी सांगितले. ज्याला परमार्थ करायचा आहे त्याने कोमल बनायलाच हवे, असे सांगून स्वामीजी म्हणाले की गीता नीट कळणे निश्चितच अवघड आहे. गीता वाचत असताना ती नित्य नूतन वाटते .
अर्जुनाने कुरुक्षेत्रावर जेव्हा भगवंतांना सांगितले की मी माझ्या आप्त सुखीयांवर बाण सोडणार नाही. ज्यांनी मला शिकविले , प्रेम दिले आणि घडवले त्यांच्यावर मी बाण कसा सोडू. परंतु दया कोठे करावी हे भगवंताला नेमके माहिती होते. त्याने अर्जुनाला कठोरपणे सांगितले की, तू क्षत्रिय आहेस आणि युद्ध करणे तुझा धर्म आहे.
उपजे ते नाशे |
नाशले पुनरपी दिसे|
हे घटका यंत्र जैसे|
परिभ्रमे गा|
अध्याय दोन ,ओवी १५९
ही ज्ञानेश्वरीतील ओवी सांगत स्वामीजी म्हणाले की, शरीर हे आवरण आहे हे कळायला हवे. अंतरंगातला मी महत्त्वाचा, हे जेव्हा समजेल तेव्हा ज्ञानेश्वरी कळायला वेळ लागणार नाही.
भगवदगीता ही कर्तव्यनिष्ठा शिकविते. या कर्तव्यनिष्ठेबाबत माऊली काय म्हणतात, याचे विवेचन उद्या बुधवारी करणार असल्याचे स्वामी गोविंददेव गिरिजी यांनी सांगितले.
- भव्य शोभायात्रेने ज्ञानेश्वरी भावकथेचा प्रारंभ.
- ज्ञानेश्वरी ग्रंथाचे पालखीतून तर स्वामीजींचे बगीतून कार्यक्रम स्थळी आगमन झाले.
- साई सुपर मार्केटच्या उद्घाटन प्रसंगी रमेशभाई ओझा यांनी म्हटले होते की, जगाने मंदिराला दुकान केले आहे तुम्ही दुकानाचे मंदिर करा. याच ध्येयातून साई सुपर मार्केट ची वाटचाल चालू असल्याचे सुरुवातीला पायल मुंदडा यांनी स्पष्ट केले.
- साई सुपर मार्केटच्या आज रौप्य महोत्सवी वर्षापर्यंत ५ शाखा कार्यरत आहेत.
- आत्मज्ञानाचा उपदेश कोणीतरी मागितल्याशिवाय करू नये, म्हणूनच भगवंतांनी अर्जुनाने जेव्हा मला काहीही कळत नाही, मी निर्णय घेताना अडखळत आहे, असे म्हटल्यानंतर त्याला योग्य सल्ला दिला, असेही स्वामीजी म्हणाले.