सोलापूर : अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण मध्यवर्ती मंडळातर्फे सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील ज्ञाती बांधवांच्या गुणवंत पाल्यांना सुमारे 72 हजार रूपयांच्या शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले.
हा कार्यक्रम देऋब्रा शिक्षणोत्तेजक संस्थेच्या दत्त चौकातील रामदास संकुलात मध्यवर्ती मंडळाचे सचिव संजय कुलकर्णी यांच्या हस्ते पार पडला. यावेळी कार्यकारिणी सदस्य रोहिणी तडवळकर, डॉ. अजितकुमार देशपांडे, सतीश पाटील, सल्लागार समिती सदस्य हरिभाऊ जतकर, महिला अध्यक्षा हेमा चिंचोळकर आदींची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. श्रीकांत येळेगावकर होते. कोरोनाचे नियम पाळून हा कार्यक्रम करण्यात आला.
यावेळी बोलताना संजय कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन म्हणून ही शिष्यवृत्ती दिली जात असल्याचे सांगून मध्यवर्ती मंडळ सातत्याने यात वाढ करून अधिकाधिक विद्यार्थ्यांना आर्थिक मदत, शिष्यवृत्ती पोहोचवण्याचा प्रयत्न करीत आहे. डॉ. अजितकुमार देशपांडे म्हणाले, आपण सगळेजण संघटनेच्या माध्यमातून एकत्रित येऊन आपल्या समाजातील गोरगरिब विद्यार्थ्यांना सातत्याने मदतीसाठी प्रयत्न करूयात. रोहिणी तडवळकर म्हणाल्या, विद्यार्थ्यांनी मिळालेल्या शिष्यवृत्तीचा उपयोग शैक्षणिक कार्यासाठी करून आपण अधिकाधिक गुणवत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न करावा. अध्यक्षस्थानावरून बोलताना डॉ. येळेगावकर यांनी विद्यार्थ्यांनी उच्च आशा-आकांक्षा, ध्येय, स्वप्ने उराशी बाळगून आपली वाटचाल केली पाहिजे. आपली स्वप्ने सत्यात उतरण्यासाठी त्यांनी आपल्या प्रयत्नात सातत्य ठेवले पाहिजे, असे आवाहन केले.
या कार्यक्रमात संस्थेचे उपाध्यक्ष हरिभाऊ जतकर यांच्या वयाला 87 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तसेच स्मिता देशपांडे यांना उर्दू मित्र पुरस्कार मिळाल्याबद्दल, विजय कुलकर्णी यांची ज्येष्ठ नागरिक संघाच्या उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या सुरूवातीला समर्थ रामदासांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यवाह श्याम जोशी यांनी सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास देऋब्रा सोलापूर शाखेचे उपाध्यक्ष शंकरराव कुलकर्णी, विजय कुलकर्णी, दत्तात्रय आराध्ये, प्रा.डॉ. नभा काकडे, आदींची उपस्थितीत होती.