राज्य उत्पादन शुल्क विभागाने शुक्रवारी जिल्हाभरात राबविलेल्या छापासत्रात हातभट्टी दारु विरोधात नोंदविलेल्या 9 गुन्ह्यात 3 लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
राज्य उत्पादन शुल्क सोलापूर विभागाच्या पथकांनी शुक्रवारी सकाळच्या सुमारास उत्तर सोलापूर तालुक्यातील ति-हे तांडा व गुळवंची तांड्यातील हातभट्टी दारु निर्मिती ठिकाणांवर छापे टाकून कारवाई केली. या छाप्यात सुनिता सिद्राम चव्हाण, वय 45 वर्षे, रा. ति-हे तांडा (ता. उत्तर सोलापूर) या महिलेच्या ताब्यातून चार हजार तिनशे किंमतीची 80 लिटर हातभट्टी दारु जप्त करुन गुन्हा नोंदविण्यात आला. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभाग व तालुका पोलीस स्टेशनच्या अधिकारी व कर्मचा-यांनी पार पाडली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने गुळवंची तांडा (ता. उत्तर सोलापूर) परिसरात हातभट्टी दारु निर्मिती केंद्रावर छापे टाकून सहा गुन्हे नोंदविले. या गुन्ह्यात हातभट्टी दारु ठिकाणांवरुन आठ हजार लिटर गुळमिश्रित रसायन, लोखंडी भट्टी बॅरल, प्लॅस्टिक बॅरल इत्यादी मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुळवंची तांडा येथून अनिता होमा चव्हाण व राजू ज्ञानदेव चव्हाण यांना अटक करण्यात आली असून त्यांचे व इतर फरार आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंदविण्यात आले. तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाने मिळालेल्या खात्रीलायक बातमीनुसार गुळवंची तांडा ते खेड रोडवर सापळा रचून हातभट्टी दारु वाहतुकीचा गुन्हा नोंद केला.
या कारवाईत दुचाकी क्र. MH-13-BZ-1354 हे वाहन रबरी ट्यूबमधील 180 लिटर हातभट्टी दारुसह जप्त केले असून दुचाकीस्वार पळून जाऊन फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे. ही कारवाई निरिक्षक सदानंद मस्करे, दुय्यम निरिक्षक उषाकिरण मिसाळ, अक्षय भरते, सुरेश झगडे, शिवकुमार कांबळे, रोहिणी गुरव, कृष्णा सुळे, सचिन गुठे, सहायक दुय्यम निरिक्षक मुकेश चव्हाण, गजानन होळकर, अलीम शेख, जवान अनिल पांढरे, वसंत राठोड, प्रशांत इंगोले, अण्णा कर्चे, आनंदराव दशवंत, चेतन व्हनगुंटी, शोएब बेगमपुरे, योगीराज तोग्गी व वाहनचालक रशिद शेख यांनी पार पाडली.
एका अन्य कारवाईत दुय्यम निरिक्षक विनायक जगताप यांनी जवान विकास वडमिले यांच्यासह करमाळा तालुक्यातील वांगी नंबर 1 येथील हातभट्टी ठिकाणावर छापा टाकून गणेश सहदेव जाधव, वय 32 वर्षे या इसमाच्या ताब्यातून 1700 लिटर रसायन, लोखंडी बॅरेल, चाटू टोपली इ. साहित्य असा एक्केचाळीस हजार पाचशे किंमतीचा मुद्देमाल जप्त केला. तसेच दुय्यम निरिक्षक पंढरपूर मयुरा खेत्री यांनी जवान प्रकाश सावंत सह पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी गावाच्या हद्दीतील हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून 250 लिटर रसायन जागीच नाश केले.
आवाहन
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणत्याही ठिकाणी अवैध हातभट्टी दारु निर्मिती / वाहतूक / विक्री/ साठा, बनावट दारु, परराज्यातील दारु याबाबत माहिती मिळाल्यास या विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002339999 व व्हाट्सअप क्रमांक 8422001133 वर संपर्क साधावा, असे आवाहन अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क सोलापूर नितिन धार्मिक यांनी केले आहे.