विट्यामध्ये दाम्पत्याचा आत्महत्येचा प्रयत्न; दोघेही अत्यवस्थ; सुसाईड नोट ने विटा शहरात खळबळ

0
38

सांगली ( सुधीर गोखले) – संघर्ष करूनही आपल्या घरी आणि शेताकडे जाणाऱ्या रस्त्याला परवानगी मिळत नसल्याने सांगली जिल्ह्यातील विटा येथील दाम्पत्याने फेसबुक लाईव्ह करून विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडल्याने विटा आणि परिसरात खळबळ उडाली आहे.प्रशांत प्रल्हाद कांबळे आणि स्वाती प्रशांत कांबळे असे या पती-पत्नीचे नाव असून त्यांच्यावर विटा येथील ओम श्री रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आत्महत्येचा प्रयत्न करण्यामागे आपल्या घराकडे आणि शेताकडे जाणारा रस्त्याला प्रशासनाकडून परवानगी मिळत नसल्याच्या कारणातून या दाम्पत्याने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची प्राथमिक माहिती आहे. सध्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या दाम्पत्याने एक सुसाईड नोट देखील लिहिली आहे. दाम्पत्याने तहसीलदाराकडून आपले काम होत नसल्याचा आरोप यामध्ये केला आहे. याबाबत विटा तहसीलदारांशी संपर्क साधला असता सदर व्यक्ती हा घरासाठी रस्ता मागत होता, पण तो रस्ता देणं हा तहसीलदारांच्या अखात्यारीमधील विषय नाही. याबाबतचा निर्णय काही दिवसांपूर्वी झाला होता, असं त्यांचं म्हणणं आहे. 

दाम्पत्यानं लिहिलेली सुसाईड नोट YES NEWS मराठी च्या हाती
श्री. उदयसिंह गायकवाड साहेब तहसिलदार (विटा, ता. खानापूर) यांनी माझ्या केसकामी माझ्यावर अन्याय केला आहे. त्यांनी दिनांक 25/5/2017 रोजी माझ्या केसचा दिलेला निर्णय राजकीय दबावापोटी अथवा मोठ्या आर्थिक लोभापोटी दाबून तो निर्णय बदलला आहे. दिनांक 18/7/2023 रोजी माझा रस्त्याच्या केसचा दावा फेटाळून दिला आहे. माझी मागणी संविधानिकच नाही असे त्यात म्हटले आहे. या तक्रार केसमागे राजकीय हस्तक्षेप होत असल्यामुळेच मी उपोषण देखील केले होते. परंतु, नवीन तहसिलदारांनी दिलेला निर्णय मला व माझ्या कुटूंबासाठी अन्यायकारक आहे. सुरुवातीपासूनच विटामधील नेता समीर कदमने माझ्या घरगुती भांडणात भांडवल करून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न केला आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये मला व माझ्या कुटूंबास त्याने दोषी ठरवले आहे. या केसच्या निर्णय बदलण्याच्या कामात सुद्धा त्याचाच हात असल्याची माझी खात्री आहे. विवेक भैय्या मला माफ करा. तुम्ही प्रत्येक वेळी माझ्या बाजूने ठाम उभा राहिला. मला बळ दिले, पण मी आता खचलो आहे. आपण न्याय मागितला,  भांडलो, लढलो परंतु शेवटी  कुंपणच शेत खातंय. तहसिलदारच कोणाच्या दबावापोटी पहिला निर्णय देवून तो दाबून दुसरा निर्णय ते असतील तर आपण दाद तरी कोणाकडे मागायची. पुढे अपिलात गेलो तरी असंच होणार नाही, याची काय खाली आहे. मला माफ करा, भैय्या (यामागे मोठी राजकीय शक्ती सुद्धा आहे.) भाई अप्पा मला माफ करा,  त्या स्त्याचा नाद सोडा, त्या जमीनीचा सुद्धा नाद सोडा, नको ती जमीन आपल्याला. तुम्ही ज्ञानेशला घेवून मामाकडे जा. तिथेच रहा, हे राजकारणी तुम्हाला जगू देणार नाहीत. मी माझी पत्नी दोघेही आमचे जीवन संपवत आहोत. यासाठी समीर कदम, विठ्ठल कांबळे, सुनिल कांबले अनिल कांबळे, किशोर कांबळे त्याची पत्नी पूनम कांबळे, विक्रांत कांबळे आणि तितकेच तहसिलदार उदयसिंह गायकवाड सुद्धा जबाबदार आहेत. मला व माझ्या कुटूंबालाही लोक जगू देणार नाहीत हे मला चांगलच माहीत झालं आहे, आई अप्पा मामा ज्ञानेशला चांगल शिकवा, मला माफ करा, माझा प्रशासनावर विश्वासच राहिला नाही. मी आणि स्वाती स्वेच्छेने मृत्यू जवळ करत नाही , खूप विचार करून आम्ही हा निर्णय घेतला आहे. माझा मृत्यू आपल्या विट्याच्या घाणेरड्या राजकारणामुळेच. मला माफ करा.