सोलापूर – सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओंबासे यांनी आयुक्त पदावर यशस्वीपणे एक वर्ष पूर्ण केल्याबद्दल आज त्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते पुस्तक भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या. महापौर विनायक कोंड्याल यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, डॉ. सचिन ओंबासे यांच्या कार्यकाळात शहर विकासाच्या विविध कामांना गती मिळाली असून प्रशासनात शिस्त, पारदर्शकता आणि कार्यक्षमता वाढीस लागली आहे. नागरिकाभिमुख निर्णय, स्वच्छता, पायाभूत सुविधा, तसेच विविध विकासकामांच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे सोलापूर शहराच्या प्रगतीला नवी दिशा मिळाली आहे. पुढील काळातही शहराच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे समन्वयाने काम सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, माजी महापौर श्रीकांचना यन्नम, शहराध्यक्ष रोहिणी तळवडकर, उपायुक्त आशिष लोकरे, नगरसेवक प्रथमेश कोठे, नगरसेवक किसन जाधव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही डॉ. सचिन ओंबासे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे वातावरण उत्साहपूर्ण व स्नेहपूर्ण होते.

