माकपाचा कार्यकर्ता कॉ. श्रीनिवास म्हेत्रे यांनी पक्षाला दिले ५१ हजार रुपये निवडणूक निधी !
सोलापूर दि.२४:- महाराष्ट्र राज्याच्या आगामी विधान सभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या राज्य समितीने निवडणूक निधी संकलनाची हाक देण्यात आली. त्या अनुषंगाने ४ जुलै २०२४ रोजी सोलापूर येथे निधी संकलन मोहिमेला सुरुवात करण्यात आली. या मोहिमेला प्रतिसाद देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे माजी राज्य सचिव, केंद्रीय समिती सदस्य तथा माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी आपल्या मानधनातून ७० हजार रुपये निवडणूक निधी म्हणून पक्षाकडे सुपूर्द केले. तसेच कार्यकर्ते कॉ. श्रीनिवास म्हेत्रे यांनी आपल्या पगारीतून ५१ हजार रुपये निधी पक्षाला दिले.
पक्षाच्यावतीने निधी संकलनासोबत आगामी विधान सभेच्या निवडणूकीची तयारी करण्याकरिता सर्व साधारण सभा बोलाविण्यात आली असून या सभेत सोलापूर शहराच्या सर्वांगीण विकासाची चर्चा तसेच स्थानिक नागरी समस्यांना वाचा फोडण्यासाठी व मुलभूत नागरी सेवासुविधा नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी माकपाचे कार्यकर्ते सदैव तत्पर असून आगामी विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ नेते कॉ. आडम मास्तर यांना विधानसभेत पाठविण्याचा वज्र निर्धार केल्याचे पक्षाचे जिल्हा सचिव ॲड. एम.एच.शेख यांनी व्यक्त केले.
बुधवार दि. २४ जुलै २०२४ रोजी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय दत्त नगर येथे सचिव मंडळ सदस्य कॉ. शंकर म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली.

यावेळी सर्वसाधारण सभेला संबोधित करताना कॉ. नरसय्या आडम मास्तर म्हणाले कि, आपण वर्ग लढा पुढे नेत असून सर्वसामान्यांचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी तहह्यात रस्त्यावरची लढाई लढतो. त्यामुळे सत्ताधाऱ्यांवर जनतेच्या आंदोलनाचा, चळवळीचा दबाव आणि प्रभाव पडत असतो. म्हणून शासन काहीअंशी आपल्या मागण्या मान्य होतात. मात्र आपले जिव्हाळ्याचे प्रश्न व न्याय हक्काच्या मागण्या मान्य होण्यासाठी विधी मंडळात या प्रश्नांची जाणीव असणाऱ्या लोकप्रतिनिधीची गरज असते. याकरिता कार्यकर्त्यांनी सोलापूर शहरासह महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला विकासापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला जाब विचारण्यासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचा कार्यकर्ता विधी मंडळात पाठवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांवर आहे. अशी भावनिक साद घालत महाविकास आघाडी व पक्षाच्या मजबूत बांधणीवर विधानसभा जिंकण्याचा विडा उचलला.
यावेळी मंचावर पक्षाचे राज्य समिती सदस्य कॉ. नसीमा शेख, कॉ. नलिनीताई कलबुर्गी, कॉ. युसुफ शेख (मेजर), कॉ. व्यंकटेश कोंगारी, कॉ. रंगप्पा मरेड्डी, कॉ. म.हनीफ सातखेड, कॉ. सुनंदाताई बल्ला, कॉ. शेवंता देशमुख, कॉ. कुर्मय्या म्हेत्रे, कॉ. ॲड.अनिल वासम आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन ॲड.अनिल वासम यांनी केले.