सोलापूर : दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपंचमी निमित्त तेलुगु नाभिक समाजाचे कुलदैवत भगवान श्री चिमटेश्वर महाराज यांचा रथोत्सव शुक्रवारी मोठ्या भक्तीभावात व उत्साहात साजरा करण्यात आला.
नागपंचमी रोजी या समाजातर्फे चिमटेश्वर यांचा रथोत्सव काढण्याची प्रथा आहे. शुक्रवारी पहाटे साडेपाच वाजता साईबाबा चौक येथील तेलुगु नाभिक ज्ञाती संस्थेच्या चिमटेश्वर मंदिरामध्ये मानकरी संजीव कोंडूर परिवाराच्यावतीने गणपती पूजा, अन्नपूर्णादेवी पूजा, महारुद्र अभिषेक, होमहवन करण्यात आला. राजू तमनूर, राजू सामल यांच्या वतीने महापूजा विधी पार पाडली. सतीश बोला यांच्या पौरोहित्याखाली पूजा विधी पार पडली.
मंदिरात विविध पूजा विधी पार पडल्यानंतर चिमटेश्वर यांची उत्सवमूर्ती कन्ना चौक परिसरातील हनुमान मंदिराजवळ आणण्यात आली. त्यानंतर विविध फुलांनी सजवलेल्या रथामध्ये ही मूर्ती ठेवण्यात आली. त्यानंतर सवाद्य मिरवणुकीला सुरुवात झाली. मिरवणुकीत विविध कलाप्रकार सादर करणारी मंडळे सहभागी झाली होती.
नाभिक युवक संघटना, फ्रेंड्स डान्स ग्रुप आर्या टू डान्स ग्रुप यामध्ये समावेश होता.
मिरवणुकीत तेलुगु नाभिक समाजाचे अध्यक्ष अनिल कोंडूर, युवक अध्यक्ष भास्कर तमनूर, उत्सव समिती अध्यक्ष पुंडलिक पुंडलिक रासमल, आनंद सिंगराल, अभयकुमार कांती, दशरथ बल्लोजी, प्रसाद सुरमपल्ली, वेणू सुरमपल्ली, विठ्ठल सिंगराल, यल्लय्या नडीगोटू, सत्यनारायण सिंगराल, राजू कडिंगुल, शेखर कोंडापुरे संजय कोंडूर, राजू जांपाल, बालराज सोमल, रामुलू कोंडूर, सदानंद कोत्तीगट्टू, सिद्राम श्रावणपल्ली, मोहन जमदाडे, ओमप्रकाश सुरमपल्ली यांच्यासह मराठी भाषिक नाभिक बांधव देखील सहभागी झाले होते.
कन्ना चौक येथून मिरवणुकीची सुरुवात झाल्यावर पूर्व भागातील प्रमुख चौकांमधून त्याची परिक्रमा होत ही मिरवणूक साईबाबा चौकातील चिमटेश्वर मंदिराजवळ विसर्जित झाली. त्यानंतर भाविकांना महाप्रसाद देण्यात आला.