सोलापूर विचार मंचचा लढा अखेर यशस्वी : डॉ. संदीप आडके
सोलापूर : कुमठे येथील सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा को-जनरेशन चिमणी पाड कामातील अडसर अखेर आठ तारखेला दूर झालेला आहे. पाडकाम करण्याबाबत मंत्रालयाच्या न्याय आणि विधी खात्याने स्पष्ट अहवाल नगर विकास खात्याचे मुख्य सचिव,भूषण गगराणी यांच्याकडे पाठविला आहे व अकरा तारखे पर्यंत पाड कामाबाबतचे आदेश मंत्रालयातून सोलापुरातील जिल्हाधिकारी व आयुक्तांना प्राप्त होतील असे भूषण गगराणी यांनी डॉ.आडके यांना सांगितले आहे.
२१जानेवारी २०२१पासून या चिमणीचे पाडकाम करावे असे माननीय उच्च न्यायालयाने सोलापूर महानगरपालिकेस सांगितले होते परंतु११ फेब्रुवारी २०२१ रोजी नगर विकास खात्याच्या न्याय व विधी खात्याचे अभिप्राय येईपर्यंत प्रत्यक्ष पाड काम करू नये असे किशोर गोखले ,अवर सचिव यांच्या पत्रामुळे ह्या पाडकामाची टेंडर प्रक्रिया पूर्ण करून सुद्धा आजतागायत प्रत्यक्ष चिमणी पाडकाम होत नव्हते. चिमणी पाडकाम करून होटगी रोड विमानतळ त्वरित चालू करण्याच्या पाठपुरावा मंचतर्फे पंतप्रधान कार्यालयापासून, नागरी उड्डाण मंत्री ,मुख्यमंत्री कार्यालय, डीजीसीए, एअरपोर्ट अथोरिटी ऑफ इंडिया या सर्वांकडे सातत्याने केल्या मुळे या चिमणी पाडकामाची वर्क ऑर्डर बीनियास कंपनीस नुकतीच देण्यात आली आहे. त्यामुळे सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या बेकायदा चिमणी पाडकामाचा मार्ग आता संपूर्णपणे मोकळा झाला आहे. सोलापूर विचार मंच तर्फे हा लढा सर्व पातळीवर लढण्यात आला होता आणि या लढ्याला अंतिम स्वरूप देऊन मंचच्या वतीने देण्यात आलेल्या १० ऑक्टोबर या ‘डेडलाईन’ च्या आधीच या घडामोडी झालेल्या आहेत ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे.
सोलापूर विमानतळ प्राधिकरणाचे प्रमुख श्री चांपला बनोत हे होटगी रोड विमानतळास डीजीसीए कडून मान्यता मिळवण्याबाबत अत्यंत सक्रिय असल्याचे व त्याबाबत मुख्यालयामध्ये अतिशय तातडीने घडामोडी होत असल्याची माहिती त्यांनी काल डॉ.संदीप आडके यांना दिली. त्यामुळे सोलापूर विचार मंचचे श्री संजय थोबडे ,डॉ.संदीप आडके व इतर सर्व त्यांच्या सहकाऱ्यांनी सोलापूरचे होटगी रोड विमानतळ चालू होण्या बाबत जो संघर्ष उभा केला त्याला नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर यश प्राप्त झाले आहे. यामध्ये त्यांच्या सर्व सहकाऱ्यांबरोबरच प्रसारमाध्यमांनी अत्यंत मोलाची कामगिरी केली आहे असे डॉ. संदीप आडके यांनी सांगितले.