सोलापुरातील सायकल प्रेमी श्री प्रकाश दामोदर गिरी यांनी वर्षभरात 100 किलोमीटरच्या शंभर राईड पूर्ण करीत 251 अर्धशतकी म्हणजेच 50 कि.मी. च्या सायकल राईड पूर्ण करीत आजतागायत एकूण पंचवीस हजार किमी पेक्ष्या जास्त सायकलिंग करण्याची अफलातून कामगिरी केली आहे.

मुळचे सोलापूरचेच असणारे श्री प्रकाश गिरी हे कॉमर्समध्ये ग्रॅज्युएट असून सोलापूर महानगरपालिका येथे कार्यरत होते. शासकीय सेवा पूर्ण करून 2022 साली सेवानिवृत्त झाले. सेवानिवृत्तीनंतर काय करावे हा मोठ्या प्रश्न उभा राहिला. आता वेळ भरपूर होता पण शरीर पहिल्यासारखे राहिले नव्हते. त्यामुळे व्यायाम करून आधी फिटनेस वाढवायचा आणि निरोगी आणि आनंदी आयुष्य जगायचे असा संकल्प त्यांनी केला. घरात सायकल बसून होती ती बाहेर काढून सकाळी फेरफटका मारायला जाऊ लागले. त्यातून सायकल विषयी प्रेम वाढत गेले. मित्रांसोबत सायकलिंग करताना मजा ही येऊ लागली. सोलापुरात दर रविवारी सायकलिंग करणार्या सायकल लवर्स सोलापूर या ग्रुप बद्दल मित्र रोहन व गिरीराज यांनी माहिती दिली. सुरुवातीला ग्रुपच्या सदस्यांसोबत रविवारी वीस ते तीस किलोमीटर सायकलिंग केले. त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास वाढला.

मित्र आणि नातेवाईक यांचे कडून या वयात एवढा व्यायाम करू नये म्हणून प्रचंड दडपण येत होते. मात्र आवड निर्माण झाली होती. आता थांबणे अशक्य होते. हळूहळू अंतर वाढवत डिसेंबर 2022 ला त्यांनी पहिली शंभर किलोमीटर ची राईड पूर्ण केली. साठीच्या वयात एवढे अंतर विनासायास पूर्ण केल्याचा आनंद गगनात मावेना आणि या वयात ही आपण तरुण असल्याची जाणीव झाली.
अंतर वाढले तसे चांगल्या सायकल ची गरज वाटू लागली. नवीन सायकल घेतली. आणि नव्या जोमाने दररोज कमीत कमी 50 किंवा जास्तीत जास्त 100 किलोमीटर सायकलिंग करू लागले. दररोज पहाटे चार वाजता सायकलिंगला सुरूवात करतात .मुलगी छत्रपती संभाजी नगर येथील मेडिकल कॉलेज ला डॉक्टर चे शिक्षण घेत असल्याने कधी सोलापुरात तर कधी छत्रपती संभाजी नगर येथे सायकलिंग करतात. 50 किलोमीटर साठी अडीच तास लागतात शंभर किलोमीटर साठी पाच तास लागतात. एका दिवसात 200 किमी पेक्षा जास्त अंतर पार करण्याचा विक्रम ही त्यांनी नोंदवला आहे.
“सेवानिवृत्तीनंतर आरोग्य चांगले राहावे आणि मन प्रसन्न राहावे यासाठी छंद म्हणून सायकलिंग करतो. महिन्याकाठी दोन हजार किलोमीटर सायकलिंग होते. सन 2023 मध्ये जानेवारीपासून आजतागायत 15717 किलोमीटर इतके सायकलिंग केले असून 25 हजार किलोमीटर एका वर्षात पूर्ण करण्याचा संकल्प आहे. एवढे सायकलिंग करून मला कंबर गुडघा किंवा इतर कसलेही प्रकारचा त्रास झाला नाही. त्यासाठी रात्री लवकर झोपूतो व पहाटे उठून सायकलिंग करतो. आहारामध्ये प्रोटीन कॅल्शियमचे पदार्थ जास्त सेवन करतो. सायकलिंग झाल्यानंतर योग्य पद्धतीने स्ट्रेचिंग करतो. राइड ला जाताना सुरक्षेची योग्य ती काळजी घेतल्याने कुठलाही अपघात झाला नाही. सध्याच्या तंत्रज्ञानाच्या युगात शारीरिक श्रम कमी झाल्याने शुगर, बीपी, लठ्ठपणा हे आजार वाढले आहेत त्यासाठी नियमित सायकलिंग करणे खूप गरजेचे आहे. सोलापुरात सायकल लवर्स सोलापूर ग्रुप कडून दर रविवारी सायकल राईड असते त्यात सहभागी व्हावे. सर्वांसोबत मिळून सायकलिंग केल्याने उत्साह वाढतो “*
प्रकाश गिरी यांनी आपली शंभरावी शतकी राईड दिनांक 6 ऑगस्ट रोजी सायकल लवर्स सोलापूर ग्रुपच्या सदस्यासोबत यशस्वीरीत्या पूर्ण केली. सदर कामगिरीबद्दल सायकल लवर्स सोलापूरच्या वतीने संडे सायकलिंग समन्वयक श्री प्रवीण जवळकर यांनी त्यांचा सत्कार केला. या अतुलनीय कामगिरी बद्दल सायकल लवर्स सोलापूरचे मुख्य समन्वयक श्री महेश बिराजदार, ईंजी.अमेय केत, श्री.अविनाश देवाडकर ,डॉ. प्रवीण ननवरे यांनी त्यांचे अभिनंदन केले. आज तुळजापूर रोड येथे आयोजित केलेल्या सेंचुरी राइड ला सायकल लवर्स सोलापूरचे सदस्य पो.नि. श्री.नागेश गायकवाड, श्री. दादाराव इंगळे, श्री.जतीन पटेल, श्री.रोहन वर्दा, श्री.अंबरीश कदम, श्री.गिरीराज जखोटिया, श्री. नितीन वडगावकर, श्री. नागेश स्वामी, श्री. सुरेश मनुरे, श्री. अविनाश कुरापाटी यांनी ही श्री प्रकाश गिरी यांच्यासोबत शंभर किलोमीटर ची राईड यशस्वीरित्या पूर्ण केली.