आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भारत राष्ट्र समिती (बीआरएस-BRS) पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी महाराष्ट्रात आपला पक्ष वाढविण्यासाठी हालचाली वाढवल्या आहेत. नांदेड जिल्ह्यात झालेल्या पहिल्या सभेनंतर के चंद्रशेखर राव यांनी आता मराठवाड्यावर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच एक भाग म्हणजे 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी याबाबत माध्यमांना माहिती दिली आहे. त्यामुळे या सभेकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्याच्या राजकारणात छत्रपती संभाजीनगर शहराचे विशेष महत्व आहे. त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष या जिल्ह्यात आपला पक्षाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न केला जातो. अशातच राज्यात नव्याने एन्ट्री केलेल्या तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती (बीआरएस) पक्षाने देखील संभाजीनगरमध्ये पक्षवाढीसाठी प्रयत्न सुरु केले आहेत. काही दिवसांपूर्वी माजी आमदार हर्षवर्धन जाधव, राष्ट्रवादीचे नेते कदीर मौलाना आणि माजी आमदार भाऊसाहेब चिकटगावकर यांचे पुतणे अभय चिकटगावकर यांनी बीआरएसमध्ये प्रवेश केला आहे. त्यातच आता 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये बीआरएसची सभा होणार आहे.
राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार
मागील 70 वर्षांत काँग्रेस आणि भाजप या पक्षांनी राज्याचा कारभार पाहिला, मात्र या काळात शेतकरी, कामगार, सर्वसामान्य जनतेला काय मिळाले. आजही या घटकांची अवस्था बिकटच आहे. मात्र बीआरएस पक्ष त्यांच्या जीवनात खरी समृद्धी आणण्याचे काम करणार आहे. तेलंगाणामध्ये मुख्यमंत्री केसीआर यांनी ते करून दाखविले आहे. केसीआर सरकारने शेतकऱ्यांसाठी दरवर्षी एकरी 10 हजार रुपये अनुदान देणे सुरू केले. चोवीस तास मोफत वीज पुरवठा केला, शेतीसाठी पाणी उपलब्ध करून दिले. शेतकऱ्यांना पाच लाख रुपयांचे विमा कवच दिले, असे अनेक शेतकरी हिताचे निर्णय घेतले आहेत. केसीआर सरकार हे शेतकऱ्यांचे सरकार आहे. त्यामुळे महाराष्ट्रात देखील आम्ही राजकारण बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या हिताचे काम करणार असल्याचे हर्षवर्धन जाधव म्हणाले.
पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम…
प्रादेशिक पक्ष असलेल्या बीआरएसला आता राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी आपला पक्ष देशभरात वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु केला आहे. दरम्यान त्यांनी याची सुरवात महाराष्ट्रातून केली आहे. त्यामुळे केसीआर राज्यातील अनेक महत्वाच्या राजकीय नेत्यांना आपल्या पक्षात घेण्यासाठी गळ घातला आहे. तर बीआरएसमध्ये प्रवेश घेणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. तसेच 24 एप्रिलला छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोणते नेते या पक्षात जाणार याची चर्चा पाहायला मिळत आहे.