भाजप सरकारने चूकीचे धोरण आखत शेतकऱ्यांच्या पोटावर पाय दिले. मागील १० वर्षात पाणीप्रश्न मार्गी न लावून जनावरांच्या मुळावर उठले. दुधाला कवडीमोल भाव मिळतोय. हे सरकार शेतकरी विरोधी सरकार असल्याचा टीका सोलापूर लोकसभेच्या काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांनी भाजप सरकारवर केली. प्रणिती आज मंगळवेढा दौऱ्यावर आहेत. यात त्यांनी सलगर बुद्रुग, लवंगी, आसबेवाडी, शिवणगी, सोड्डीसह अनेक गावांना भेटी दिल्या त्यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.
गाव भेट दौऱ्यात बोलताना प्रणिती म्हणाल्या, “दुधाला योग्य भाव मिळत नाहीये. यामुळे शेतकऱ्यांना आपली जनावरे विकावी लागत आहेत. शेतकरी पीकविम्यापासून वंचित आहेत. काँग्रेसने चालू केलेल्या चारा छावण्या यांनी बंद पाडल्या. मंगळवेढा तालुक्यातील ३५ गावांचा पाणी प्रश्न जैसे थे आहेत. पाणी प्रश्न सोडवण्यास हे सरकार अपयशी ठरलं आहे. यांनी मागील १० वर्षात काय काम केलं याचा हिशोब द्यावा? असे आव्हानही प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे. यासाठी मी आरक्षणासाठी शेवटपर्यंत मराठा समाजासोबत राहणार असल्याचं आश्वासनही यावेळी शिंदे यांनी समाजाला दिले. तत्पूर्वी लवंगी येथे समस्त मराठा समाजाचा प्रणिती शिंदे यांना पाठिंबा जाहीर करण्यात आला. यावेळी मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचे पाण्याचा आणि दूध दराचा प्रश्न सोडवण्याची मागणी लवंगी ग्रामस्थांनी केली.
प्रणिती यांच्या भेट दौऱ्यात काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष नंदकुमार पवार, तालुकाध्यक्ष प्रशांत साळे, ज्येष्ठ नेते शिवाजी काळुंगे आदी उपस्थित होते. प्रणिती यांचे विचार ऐकण्यासाठी मोठी गर्दी होत आहे.