मालेगाव :जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी पालकमंत्री दादा भुसे यांच्या घरावर बिऱ्हाड मोर्चा काढला. हा मोर्चा मालेगावला निघाला मात्र त्याचा धसका सहकार मंत्र्यांनी मंत्रालयात घेऊन त्यावर तोडगा काढला. एकंदरच राजू शेट्टी यांच्या या मोर्चाने सहकार मंत्री अतुल सावे नरमले.
जिल्हा बँकेच्या सक्तीच्या वसुली विरोधात येथील पोलिस कवायत मैदानावर सुरु असलेले बिऱ्हाड मोर्चा आंदोलन शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर सरळ व्याजाने आठ टक्के व्याज आकारणी करणे, सक्तीची वसुली थांबविणे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी बँकेच्या नावे झाल्या आहेत त्यांना स्थगिती देवून एक रकमी तडजोड योजनेत सहभागी होण्याची संधी देण्याचे आश्वासन सहकारमंत्री अतुल सावे आणि पालकमंत्री दादा भुसे यांनी दिले. त्यामुळे हे आंदोलन सोमवारी सायंकाळी मागे घेण्याची घोषणा स्वाभिमानी संघटनेचे राजू शेट्टी यांनी केली.
सरकारने आश्वासन पाळले नाही तर १६ फेब्रुवारीपासून मुख्यमंत्र्यांच्या दारात बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. दरम्यान सहकार मंञ्यांनी लेखी आश्वासन न दिल्याने आंदोलनकर्त्यांमधील शेतकरी संघटनेचा एक गट आंदोलनावर ठाम आहे. यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये मतभेद असल्याचे स्पष्ट झाले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललीत बहाळे-पाटील व महिला आघाडीच्या सीमा नरवडे यांचे समर्थक आंदोलनस्थळी तळ ठोकून आहेत. रात्री उशिरापर्यंत संघटनेचा निर्णय झालेला नव्हता. स्वाभिमानी संघटनेच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मात्र आंदोलनातून काढता पाय घेतला.
जिल्हा बँकेने बँकेवर दरोडा घालणाऱ्या धनदांडग्यांची कर्जवसुली करावी. शेतकऱ्यांची सक्तीची वसुली तात्काळ थांबवावी, एक रकमी परतफेडीसाठी सवलत द्यावी. सहा ते आठ टक्के व्याजाने थकीत कर्ज भरुन घ्यावे. या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकरी संघटनेतर्फे पालकमंञ्यांच्या निवासस्थानासमोर बिऱ्हाड आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. तत्पुर्वी श्री. भुसे यांनी रविवारी नाशिक येथील संपर्क कार्यालयात शेट्टी व शेतकऱ्यांशी चर्चा करुन सहकार मंञ्यांना यात लक्ष घालण्याचे आश्वासन दिले होते. चर्चा निष्फळ ठरल्याने आज दुपारी आंदोलनाला सुरवात झाली. महामार्गावरील मनमाड चौफुलीपासून जुन्या महामार्गाने आंदोलनकर्ते महात्मा गांधी पुतळ्याजवळ आले.
भुसे यांच्या निवासस्थानासमोर जागा नसल्याने पोलिसांनी बॅरेकेटींग करुन आंदोलनकर्त्यांना अडवले. सोयीसाठी पोलिस कवायत मैदानावर आंदोलन करण्याची विनंती केली. यानंतर आंदोलनकर्त्यांनी पोलिस कवायत मैदानावर दुपारपासून रात्री साडेसातपर्यंत ठिय्या मांडला. या दरम्यान संघटनेचे पदाधिकारी, सुकानू समिती व शेतकऱ्यांदरम्यान दोन वेळा बैठक झाली. नेमका काय निर्णय घ्यावा याबद्दल एकमत होवू शकले नाही.
यादरम्यान बाजार समितीचे माजी उपसभापती सुनील देवरे, माजी उपमहापौर निलेश आहेर यांनी पालकमंत्री भुसे यांच्याशी संपर्क साधत शेट्टी व आंदोलनकर्त्यांचे आंदोलनस्थळी स्पीकरवर बोलणे करून दिले. सहकारमंत्री सावे यांनी मागण्या मान्य केल्या असून त्याचा पाठपुरावा आपण करु. आंदोलन मागे घ्यावे असे आश्वासन श्री. भुसे यांनी दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. या भूमिकेला शेतकरी संघटनेच्या एका गटाने विरोध दर्शविला. ही लढाई आर-पारची असून लेखी आश्वासन हवे या भूमिकेवर ते ठाम होते. आंदोलनात शेट्टी,डहाळे, अर्जुन बोराडे, अनिल धनवट, सीमा नरवडे, संदीप जगताप, खेमराज कोर, शेखर पगार, बिंदुशेठ शर्मा, वसंतराव कावळे, संतोष रहेरे, भोजराज चौधरी, गंगाधर निखारे, प्रशांत कड, बापूसाहेब महाले आदींसह हजारो शेतकरी सहभागी झाले होते.