चंदीगड : महायुतीच्या जागावाटपासाठी मुंबई ते दिल्ली बैठकांवर बैठकांचा सिलसिला सुरू आहे. जागावाटपावर तोडगा काढण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांनी दिल्ली दौरा केला. या दौऱ्यानंतर चंदीगडमध्ये जागावाटपासंदर्भात बैठक सुद्धा पार पडली. मात्र या बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. चंदीगडमध्ये जागा वाटप संदर्भात बैठक झाल्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली.
दरम्यान, पहिल्यांदा चंदीगडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह यांच्यासोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार रूममधून बाहेर पडले. यानंतर एकनाथ शिंदे यांना अमित शाह यांनी थांबवलं. त्यानंतर 15 ते 20 मिनिटे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. अतिशय महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. ही 15 ते 20 मिनिटांची चर्चा होत असताना देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांना मात्र हॉटेल बाहेर थांबावं लागलं. त्यामुळे महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रतिमेवर भाजपचे केंद्रीय नेतृत्व खुश असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे. इतकेच नव्हे तर विधानसभा निवडणुकीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या सकारात्मक प्रतिमेचा वापर जास्तीत जास्त करावा अशी केंद्रीय नेतृत्वाची अपेक्षा असल्याचे समोर आलं आहे.