येस न्युज नेटवर्क : मागील काही दिवसांपासून समृद्धी महामार्गावरील अपघाताची संख्या मोठ्याप्रमाणात वाढली आहे. काही दिवसांपूर्वी बुलढाणा येथे झालेल्या अपघातात 25 लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे प्रशासनाकडून आता अपघात रोखण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जात आहे. त्यातच आता समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणाऱ्या वाहनचालकांची अल्कोहोल टेस्ट केली जाणार असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी दिली आहे. दादा भुसे यांनी शुक्रवारी समृद्धी महामार्गाचा आढावा घेतला, यावेळी जालन्यात असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
दरम्यान यावेळी बोलताना दादा भुसे म्हणाले की, “समृद्धी महामार्गावर आता लवकरच वाहन चालकांची अल्कोहल टेस्ट होणार असून, अपघात रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे. तसेच काटेकोरपणे वाहतूक नियमांचे पालन करण्यासंबंधी पाऊल उचलली जाणार आहे.” तर आतापर्यंत समृद्धी महामार्गावर झालेल्या अपघातांमागे मानवी चुका असल्याचे देखील दादा भुसे म्हणाले. तर आजवर समृद्धी महामार्गावर 32 लाख वाहने धावली असून, त्यामुळे याकडे सुद्धा सकारात्मक दृष्टीने पाहायला हवं, असेही भुसे म्हणाले.