ईर्शाळवाडी दुर्घटनेतील आपदग्रस्तांना बालाजी फाउंडेशनकडून मदत

0
26

सोलापूर : १९ जुलैच्या रात्री रायगड जिल्ह्यातील इर्शाळवाडी ग्रामस्थांवर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेने सर्वांचे मन हेलावून गेले. जो दुःखाचा डोंगर ग्रामस्थांवर कोसळला, ज्यांनी आपले आप्तेष्ट गमावले, एका रात्रीतून बेघर झाले ती हानी कधीही भरून येणारी नाही. सोलापुरातील बालाजी अमाईन्स संचालित सामाजिक संस्था बालाजी फाउंडेशनने इर्शाळवाडी ग्रामस्थांप्रती आपली संवेदना जपत ताबडतोब ट्रकभरून जीवनोपयोगी साहित्य आणि राशन पाठवून दि. २२ जुलै रोजी स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द केले.

अधिक माहिती देताना बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकिय संचालक डी. राम रेड्डी म्हणाले कि इर्शाळवाडी येथून येणाऱ्या बातम्यांनी मन अस्वस्थ झाले, तेथील स्थानिक प्रशासनासोबत फोनवर चर्चा करुन अधिक माहिती घेतली आणि ताबडतोब २५ कुटुंबांसाठी जीवनोपयोगी साहित्यांचे किट तयार केले ज्यामध्ये राशन, दैनंदिन लागणाऱ्या भांडी, चादर आणि टॉवेल, रेनकोट, छत्री, औषधे ई. वस्तू ट्रकने रवाना करून २२ जुलै रोजी स्थानिक प्रशासनाकडे सुपूर्द केले.

स्थानिक प्रशासनाच्या वतीने रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी मदत स्वीकारली आणि बालाजी फाउंडेशनचे आभार मानले या प्रसंगी अतिरिक्त पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, पोलीस उपायुक्त दीपाली धाटे, बालाजी अमाईन्सचे प्रतिनिधी प्रसाद सांजेकर आणि सचिन मोरे उपस्थित होते.