अहिल्यादेवींनी आदर्श राज्यकारभार करत लोकाभिमुख प्रशासन चालविले: डॉ. वर्षा चौरे

0
51

सोलापूर विद्यापीठात ग्रंथ प्रदर्शन व व्याख्यान

सोलापूर – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी आपल्या २८ वर्षांच्या कार्यकाळात प्रजेला सर्वस्व मानून लोकाभिमुख प्रशासन चालवित आदर्श राज्यकारभार पाहिल्याचे गौरवोद्गार जनक्रांती संघ मुंबईच्या अध्यक्षा डॉ. वर्षा चौरे यांनी काढले.

बुधवारी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र यांच्यामार्फत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित व्याख्यानात डॉ. वर्षा चौरे या बोलत होत्या. ‘कर्तृत्वाची यशोगाथा :पुण्यश्लोक राष्ट्रमाता’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभारी कुलगुरू डॉ. राजनीश कामत हे होते. यावेळी व्यासपीठावर प्र-कुलगुरू डॉ. गौतम कांबळे,  कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत करीत अध्यासन केंद्रासंदर्भात विस्तृत माहिती दिली. व्याख्यानापूर्वी ग्रंथालयात ग्रंथप्रदर्शनाचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले.

डॉ. चौरे म्हणाल्या की, अठराव्या शतकात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे राज्य सुजलाम-सुफलाम तसेच समृद्ध होते. त्यांचे जल व्यवस्थापनाचे कार्य मोठे होते. अनेक बारवे, विहीरी, तलाव, पाणपोई, नद्यांवर घाट बांधत तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचे धोरण आखत शेत-शिवार देखील समृद्ध ठेवले होते. याचबरोबर हजारो मंदिरे निर्माण करत तसेच अनेक मोठ्या मंदिरांचा जिर्णोद्धार करीत धर्म कार्य केले. या माध्यमातून प्रजेला रोजगार देखील प्राप्त करून दिले. प्रजेला सर्वस्व मानून न्यायदानात देखील पारंगत त्या होत्या. भिल्ल जमातीच्या भक्षकांना त्या रक्षक बनवून राज्याचे रक्षण केले. त्यांच्याकडे सशस्त्र महिलांची फौज होती. प्रसंगी लढाऊवृत्तीने तसेच मुत्सद्दीपणाने त्यांनी विरोधकांवर विजय मिळवत असे, असा अहिल्यादेवींचा पराक्रमी इतिहास आपल्या व्याख्यानातून डॉ. चौरे यांनी यावेळी मांडला.

प्रभारी कुलगुरू डॉ. कामत म्हणाले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे सामाजिक व प्रशासकीय काम खूप मोठे आहे. त्यांच्या विचारांचे मूल्य आपणास रुजवायचे आहे. समाजप्रिय प्रशासन हे त्यांचे धोरण होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे नाव आपल्या विद्यापीठास असून त्यांच्याप्रमाणे समाजप्रिय प्रशासन आपणास चालवायचे आहे. राज्य प्रथम म्हणत त्यांनी सेवा केली. आदर्श राज्यकारभार पाहिले, असे ते यावेळी म्हणाले.

या कार्यक्रमास विद्यापीठाचे अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषद सदस्य तसेच विविध प्राधिकरणाचे सदस्य, शिक्षक, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. तेजस्विनी कांबळे यांनी केले तर आभार श्रुती देवळे यांनी मानले.