मुंबई : ही शान कोणाची लालबागच्या राजाची, लालबागच्या राजाचा विजय असो…..अशा जयघोषात अतिशय भावपूर्ण वातावरणात लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले आहे. मुंबईची शान असलेला लालबागचा राजाची मिरवणूक मोठ्या दिमाखात बुधवारी सकाळी 10.30 च्या सुमारास लालबागच्या राजाचे विसर्जन करण्यात आले. यावेळी लाडक्या राजाला निरोप देण्यासाठी अलोट गर्दी चौपाटीवर लोटली होती. यानंतर समुद्रात ‘लालबागच्या राजा’ चे शाही विसर्जन करण्यात आले असून ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…’च्या गजरात लालबागच्या राजाला भावपूर्ण निरोप देण्यात आला.
लालबागचा राजा सकाळी 6 च्या सुमारास गिरगावच्या चौपाटीवर दाखल झाला. गिरगाव चौपाटी परिसरात पहाटे पाचच्या सुमाराला मुसळधार पाऊस झाला आणि भर पावसातही विसर्जन सुरू होते. गिरगाव चौपाटी परिसरात चिंचपोकळीचा चिंतामणी आणि माजगावचा राजा सोबत लालबागचा राजाची मिरवणूकही भर पावसात सुरूच होती. लालबागचा राजाच्या दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांची रात्र पासून गिरगाव चौपाटीवर मोठी गर्दी पाहायला मिळाली. मुंबईतील (mumbai) लालबागमध्ये काल, मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास लालबागच्या राजाची आरती घेऊन मिरवणुकीला सुरूवात झाली. पारंपारिक वेषातच भाविकांनी या मिरवणुकीत भाग घेतला. यावेळी ढोलताशांचा दणादणाट… फटाक्यांची आतषबाजी…गुलालाची उधळण आणि गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या… चा जयघोष अशा भारावलेल्या वातावरणात बाप्पाची मिरवणूक तब्बल 23 तास सुरू होती.