मान्यवरांच्या हस्ते झाले पूजन : ७०० युवकांचा भव्य लेझीम ताफा
सोलापूर : लाडक्या श्री गणपती बाप्पाची लोभस मूर्ती, फुलांची आकर्षक सजावट आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा संदेश अशा विलोभनीय वातावरणात चौत्रा पुणे नाका गणेशोत्सव मंडळाची भव्य मिरवणूक निघाली. ७०० युवकांचा भव्य लेझीम ताफा हे या मिरवणुकीचे वैशिष्ट्य ठरले.
प्रारंभी छत्रपती श्री संभाजी महाराज चौकानजीक गणरायाचे मंडळाचे आधारस्तंभ पुरुषोत्तम बरडे, काँग्रेस शहराध्यक्ष चेतन नरोटे, माजी परिवहन सभापती राजन जाधव, संभाजी आरमार संस्थापक श्रीकांत डांगे, माजी नगरसेवक विनोद भोसले, वंचित नेते अतिश बनसोडे, आशुतोष बरडे, बेडर समाज अध्यक्ष महादेव येरनाळ, संभाजी आरमार कार्याध्यक्ष शिवाजी वाघमोडे यांच्या हस्ते करून मिरवणुकीचा प्रारंभ झाला.
छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या चरित्रातील अनेक प्रसंग ४० फुटी कंटेनर वर डिजिटल पोस्टरच्या माध्यमातून साकारण्यात आले होते. यात हिंदवी स्वराज्यात बलात्कार करणाऱ्या नराधमांचा चौरंग करण्याची छत्रपती श्री शिवरायांनी दिलेली शिक्षा, परस्त्रीचा केलेला सन्मान अशा घटना दाखवण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर मालवण येथील छत्रपती श्री शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्याच्या पार्श्वभूमीवर ‘फक्त सिमेंटमध्ये जान असून चालत नाही तर बांधणाऱ्याच्या काळजात हिरोजी इंदुलकरांसारखं इमान असावं लागतं…. माफी असावी महाराज’ असा मजकूर लिहलेला फलक लक्ष वेधून घेत होता.
गणवेश परिधान करून मोठ्या संख्येने शिस्तबद्धरितीने युवक या मिरवणुकीत सहभागी झाले होते. ढोल ताशांच्या तालावर लेझीमचे विविध डाव सादर होत होते. लेझीमचे डाव पाहण्यासाठी सोलापूरकरांनी मोठी गर्दी केली होती.