येस न्युज मराठी नेटवर्क : पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूर येथे मोटार आणि बसची धडक होऊन झालेल्या अपघातात मोटारचालक ठार झाला, तर बसमधील २५ प्रवासी जखमी झाले. जखमींमधील बहुतांश प्रवासी पुणे शहर आणि परिसरातील रहिवाशी आहेत. अपघातानंतर बस उलटी होऊन इतर वाहनांना धडका देत रस्त्यालगतच्या एका हॉटेलमध्ये शिरली. त्यामुळे इतर तीन वाहने आणि हॉटेलचेही नुकसान झाले.पुणे-नगर महामार्गावर शिक्रापूरजवळील बजरंगवाडी येथे मध्यरात्रीच्या सुमारास हा अपघात झाला
विशाल बबन सासवडे (वय ३४, रा. शिक्रापूर, ता. शिरूर, जि. पुणे) असे अपघातात ठार झालेल्या मोटारचालकाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-नगर महामार्गावरून प्रवासी बस (क्र. एमएच १४, एचयू २२६५) पुण्याहून नगरच्या दिशेने जात होती. त्याचवेळी नगरहून पुण्याच्या दिशेने येत असलेल्या मोटार (क्र. एमएच १२, पीएन ६७२८) चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती दुभाजकाला धडकली. क्षणातच ती दुभाजक ओलांडून रस्त्याच्या विरुद्ध बाजूला आली आणि समोरून येणाऱ्या बसला धडकली. त्यामुळे बस चालकाचेही नियंत्रण सुटले. बस उलटी झाली आणि रस्त्यालगत असलेल्या रॉयल पॅलेस हॉटेलमध्ये शिरली.
हॉटेलमध्ये शिरताना बसने इतर तीन वाहनांनाही धडक दिल्याने त्यांचे नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार, विक्रम साळुंके, रणजित पठारे, नितीन अतकरे, सहायक पोलीस उपनिरीक्षक महेंद्र शिंदे, पोलीस नाईक कल्पेश राखोंडे, राकेश मळेकर, शिवाजी तळोले, भरत कोळी, बापू हडागळे, विकास पाटील, संतोष मारकड, श्रीमंत होनमाने, अमोल दांडगे, जयदीप देवकर, अमोल नलगे, विकास मोरे आदींनी घटनास्थळी धाव घेतली. बसमधील सर्व जखमी प्रवाशांना नागरिकांच्या मदतीने रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणात मृत मोटार चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक वैभव पवार आणि पोलीस हवालदार प्रशांत गायकवाड करत आहेत.