मोडनिंब : माढा तालुक्यातील अरण येथे शॉर्ट सर्किटमुळे चार शेतकऱ्यांचा सुमारे साडेअकरा एकर ऊस जळून खाक झाला. या घटनेत सुमारे ५६ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. ठिबक सिंचन साहित्य, पाईपलाईन केबल, पाईप बोअरवेल साहित्य आगीच्या भक्षस्थानी सापडले. ही घटना आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. अरुण मनोहर शिंदे या शेतकऱ्याने या संदर्भात टेंभुर्णी पोलीस स्टेशनला जळीत खबर दिली आहे.
अरुण शिंदे यांच्या शेतातून महावितरणची मेन लाईन गेलेली आहे. त्यांच्या शेतीला लागून गोविंद गणपत घाडगे, रामचंद्र गणपत घाडगे, बलभीम निवृत्ती पाटील या शेतकऱ्यांचा उसाचा फड होता.
आज सकाळी ही घटना घडली घटनेदरम्यान एम. एस. ई. बी. च्या मेन लाईनवर पक्षी बसला होता. या पक्षामुळे शॉर्टकट झाले यावेळी ठिणग्या पडत होत्या त्या ठिणग्या अरुण शिंदे यांच्या शेती गट क्रमांक ३२२ मध्ये लावलेल्या उभ्या पिकावर पडल्या. याच वेळी वारा असल्याने शेतातील ऊस जळून गेला. या घटनेत अरुण शिंदे यांचा ३ एकर ऊस जळाला. त्यांचे ९ लाख रुपयाचे नुकसान झाले. वाऱ्यामुळे लगतचे शेतकरी गोविंद घाडगे यांचा ३ एकर ऊस जळाला यावेळी त्यांचे ९ लाख रुपयांचे नुकसान झाले तर, रामचंद्र घाडगे यांचा ३ एकर ऊस जळून खाक झाला त्यांचे १४ लाख रुपये नुकसान झाले. बलभीम पाटील यांचा २.५ एकर तिन्ही शेतकऱ्यांचा ऊस जळून खाक झाला. पाटील यांचे सुमारे २४ लाखाचे नुकसान झाले.
या चार शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस, शेतातील आंब्याची जुनी ३६ झाडे, ठिबक सिंचन साहित्य, पाईपलाईन, केबल पाईप तसेच बोअरवेल रस्सी, साहित्य जळून खाक झाले आहे अशी तक्रार शेतकरी शिंदे यांनी टेंभुर्णी पोलीस स्टेशनला दिली आहे.
















