सोलापूर जिल्ह्यातील ऊस दराचा तिढा आज सुटला आहे . स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन करत जबरदस्त एकजूट दाखवून पहिली उचल 3500 रुपये आणि नंतर 100 रुपयांचे दोन हप्ते देण्याची मागणी केली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी तसेच साखर कारखानदारांनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधी बरोबर तीन दिवसांपूर्वी बैठक झाली. पालकमंत्र्यांनी मध्यस्थी करून ऊस दरासाठी पहिला हप्ता 3250 द्यावा आणि त्यानंतर शंभर रुपयाचे दोन हप्ते द्यावे असे ठरविले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी लेखी आदेश देखील काढले. मात्र कारखानदारांनी आडमुठी भूमिका घेऊन हे दर आम्हाला परवडत नाहीत…
आम्हाला दोन दिवसाची मुदत द्या असे सांगितले होते. काल साखर कारखानदारांची टेंभुर्णी मध्ये बैठक झाली असून त्यात पालकमंत्र्यांनी जाहीर केलेले दर मान्य करण्याचे ठरले शेवटचा शंभर रुपयांचा हप्ता देण्यासाठी मात्र साखरेचा उतारा किमान साडेदहा टक्के असावा किंवा साखरेचा दर 45 रुपये पेक्षा अधिक असावा अशी अट साखर कारखानदारांनी पुढे केली आहे. त्यामुळे ऊस दराचा अंतिम तोडगा निघाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढल्यानुसार पहिला हप्ता 3250 रुपये प्रति टन आणि नंतर शंभर -शंभर रुपयाचे दोन हप्ते… अशी 3450 रुपयांची एफआरपी सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळणार असल्यामुळे शेतकरी संघटनेने जल्लोष केला.










