२१ नोव्हेंबरपासून नवा दर लागू; साखर तारणावर प्रतिक्विंटल ४,०५० रुपयांपर्यंत उचल मिळणार
येस न्यूज मराठी: राज्यातील साखर कारखान्यांना आर्थिक दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने घेतला आहे. बँकेने गहाण ठेवण्यात येणाऱ्या खुल्या साखरेचा मूल्यांकन दर ३,९०० रुपयांवरून थेट ४,२०० रुपये प्रतिक्विंटल केला आहे. सुधारित दर २१ नोव्हेंबर २०२६ पासून लागू करण्यात आला आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने यासंदर्भात राज्यातील सहकारी साखर कारखान्यांना परिपत्रक जारी केले आहे. साखरेच्या बाजारभावातील वाढ विचारात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार खुल्या साखरेचे मूल्यांकन ४,२०० रुपये प्रतिक्विंटल दराने केले जाणार असून, कारखान्यांना प्रतिक्विंटल जास्तीत जास्त ४,०५० रुपयांपर्यंत तारण कर्जाची उचल घेता येणार आहे.
या निर्णयाचा लाभ राज्यातील साखर कारखान्यांना होणार असून, २०२५-२६ हंगामातील विक्रीयोग्य साखर तसेच २०२६-२७ हंगामातील उत्पादित साखरेच्या मूल्यांकनासाठी सुधारित दर लागू राहणार आहे.
दरम्यान, बँकेने साखर साठवणूक, कर्जवसुली आणि तारणासंदर्भात काही अटीही निश्चित केल्या आहेत. कारखान्यांनी बँकेची थकीत कर्जे आणि व्याजाची परतफेड करण्यास प्राधान्य द्यावे, असेही निर्देश देण्यात आले आहेत.
साखरेच्या मूल्यांकन दरात झालेल्या या वाढीमुळे साखर कारखान्यांची आर्थिक तरलता वाढण्यास मदत होणार असून, ऊस उत्पादक शेतकऱ्यांची एफआरपी देणी भागवण्यासाठीही अतिरिक्त आर्थिक स्रोत उपलब्ध होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.










