महागड्या वैद्यकीय शिक्षणाचा परिणाम; MBBS प्रवेशासाठी कॉलेजांकडून 40 टक्केपर्यंत सवलतींची ऑफर!
येस न्यूज नेटवर्क: डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च मोठा अडथळा ठरत असल्याचे चित्र यंदाच्या NEET UG 2026 प्रवेश प्रक्रियेतून समोर आले आहे. देशभरातील खासगी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणावर MBBS जागा रिक्त राहिल्याने काही महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना आकर्षित करण्यासाठी शिक्षण शुल्कात तब्बल ४० टक्क्यांपर्यंत सवलत देण्याची तयारी दर्शवली आहे.
मेडिकल प्रवेश प्रक्रियेच्या तिसऱ्या फेरीनंतर देशभरात ३,४२६ MBBS जागा रिक्त असल्याची माहिती समोर आली होती. त्यानंतरच्या प्रवेश फेऱ्यांमध्येही अनेक जागा रिक्त राहिल्याचे वृत्त आहे. त्यामुळे प्रवेशासाठी विद्यार्थ्यांच्या शोधात काही खासगी मेडिकल कॉलेज आणि त्यांचे प्रतिनिधी सक्रिय झाले आहेत.
एका कोटींचे शिक्षण ८० लाखांत!
काही खासगी आणि अभिमत विद्यापीठांशी संलग्न मेडिकल कॉलेजमध्ये शुल्काबाबत मोठ्या सवलती दिल्या जात असल्याची उदाहरणे समोर आली आहेत. तामिळनाडूमधील एका अभिमत विद्यापीठाच्या मेडिकल कॉलेजने वार्षिक २५ लाख रुपयांचे शुल्क कमी करून १५ लाख रुपये करण्याची तयारी दर्शवली. म्हणजेच तब्बल ४० टक्के सवलत देण्यात आली. राजस्थानमधील एका खासगी मेडिकल कॉलेजनेही विद्यार्थ्याला ४.५ लाख रुपयांची सवलत दिल्याचे वृत्त आहे.
महागडे शिक्षण हेच रिक्त जागांचे प्रमुख कारण?
देशात वैद्यकीय महाविद्यालयांची आणि MBBS जागांची संख्या वाढत असताना खासगी महाविद्यालयांचे शुल्कही मोठ्या प्रमाणात वाढले आहे. काही अभिमत विद्यापीठांमधील संपूर्ण MBBS अभ्यासक्रमाचे शुल्क एक कोटी रुपयांपेक्षा अधिक झाले आहे. त्यामुळे गुणवंत विद्यार्थी NEET उत्तीर्ण होऊनही आर्थिक परिस्थितीमुळे खासगी वैद्यकीय शिक्षणापासून दूर राहत असल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
महाराष्ट्रातही MBBS च्या जागा रिक्त
महाराष्ट्रातील २०२६-२७ च्या प्रवेश प्रक्रियेच्या २७ ऑक्टोबरच्या आकडेवारीनुसार ८,८१४ MBBS जागांपैकी ८,७३० जागांवर प्रवेश झाले असून ८४ जागा रिक्त होत्या.
वैद्यकीय शिक्षणाचा वाढता खर्च, खासगी महाविद्यालयांचे शुल्क आणि सर्वसामान्य कुटुंबातील विद्यार्थ्यांची आर्थिक क्षमता यांचा विचार करून वैद्यकीय शिक्षण अधिक परवडणारे करण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.








