स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ओंकार शुगर, तडवळ युनिट क्रमांक ५ ला इशारा; मागील हंगामातील १०० रुपयांची थकबाकी दिवाळीपूर्वी देण्याची मागणी
सोलापूर : यंदाच्या ऊस गाळप हंगामात ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रति टन ३५०१ रुपये पहिली उचल द्यावी, तसेच केंद्र शासनाकडून एमएसपीमध्ये दरवाढ झाल्यानंतर उर्वरित रक्कम कारखाना बंद होण्यापूर्वी अदा करावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात ओंकार शुगर प्रायव्हेट लिमिटेड, तडवळ युनिट क्रमांक ५ च्या प्रशासनाला निवेदन देण्यात आले. मागील हंगामातील प्रति टन १०० रुपयांची थकीत रक्कम दिवाळीपूर्वी तत्काळ जमा करावी, अन्यथा गव्हाण बंद आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही संघटनेने दिला आहे.
ऊस उत्पादनासाठी लागणारा वाढता खर्च, खते, औषधे, मजुरी आणि इतर शेती निविष्ठांच्या वाढत्या किमतींमुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आहेत. त्यामुळे यंदाच्या हंगामात ऊसाला योग्य दर मिळणे आवश्यक असल्याची भूमिका संघटनेने मांडली आहे. पहिली उचल ३५०१ रुपये देण्यासह केंद्र शासनाच्या एमएसपी दरवाढीनंतर मिळणारी उर्वरित रक्कम कारखाना हंगाम संपवून बंद होण्यापूर्वी देण्याची मागणी करण्यात आली.
याशिवाय, मागील हंगामातील प्रति टन १०० रुपयांची थकीत रक्कम अद्याप मिळाली नसल्याने ती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास गव्हाण बंद आंदोलन करून कारखान्याचे गाळप रोखण्याचा इशारा संघटनेने दिला आहे.
यावेळी कारखान्याचे प्रशासकीय अधिकारी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, युवक अध्यक्ष मोहसीन पटेल, दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष यलगोंडा बगले, अक्कलकोट तालुका अध्यक्ष मलकारी उमदी, जिल्हा संघटक दीपक हजारे, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख चनपा बगले, शेतकरी प्रमुख राजकुमार बगले, मल्लिकार्जुन केरके, शिवराज अलगी, आकाश जमादार, रेवप्पा चिकली, सचिन माडगोंडे, मल्लिकार्जुन चडचण, आदिनाथ पवार, रतनकुमार पवार, मिलिंद माने, संगपा कोळी आदी मान्यवर उपस्थित होते.










