सोलापूर : सोलापूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयातून बनावट दिव्यांग प्रमाणपत्रे दिल्याच्या प्रकरणात आरोपी विजय बाबासाहेब गर्जे यांचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळला आहे. या प्रकरणात वैद्यकीय तपासणी न करताच दिव्यांग प्रमाणपत्रे दिल्याचा आरोप असून, सोलापूर शहर गुन्हे शाखेने आतापर्यंत आठ जणांना अटक केली आहे.
गर्जे यांच्यासह इतर आरोपींवर बनावट प्रमाणपत्रांच्या माध्यमातून शासनाच्या विविध सवलतींचा गैरफायदा घेतल्याचा आरोप आहे. तपासादरम्यान आणखी संशयास्पद प्रमाणपत्रे समोर आली असून, पोलिसांकडून कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणातील आरोपींच्या जामीन अर्जांवर सुनावणी होत असताना न्यायालयाने विजय गर्जे यांचा जामीन अर्ज फेटाळल्याने रॅकेटमधील आरोपींच्या अडचणी वाढल्या आहेत











