डीजेसमर्थकांना नाही, जनतेला अभय द्या’, ‘सण-उत्सव आनंद देण्यासाठी आहेत, शिक्षा देण्यासाठी नाही’, ‘बंद करा, बंद करा… डीजे बंद करा’ आणि ‘नेत्यांनो, आश्वासने नकोत; डीजेविरोधातील भूमिका कृतीतून दाखवा’ असे फलक हातात घेत रविवारी (दि. ३०) पुणेकरांनी डीजेच्या दणदणाटाविरोधात आवाज बुलंद केला.
पुणेकर गणेशोत्सवातील डीजे ध्वनी प्रदूषणाविरोधात रविवारी सकाळी एकवटले. उत्सवाच्या काळात कोणतीही मुभा न देता संपूर्ण डीजे बंदी करावी या मागणीसाठी शेकडो नागरिक नामदार गोपाळकृष्ण गोखले चौकातील परिसरात एकत्र आले आणि त्यांनी उत्सवाच्या नावाखाली ध्वनी प्रदूषण सहन केले जाणार नाही असा खणखणीत इशारा व नागरिकांच्या आरोग्याशी खेळू नका असा स्पष्ट संदेशही यावेळी दिला.
विद्यानंद बापट यांनी या डीजेच्या विरोधात भूमिका घेतल्यानंतर आता सर्वसामान्य नागरिक देखील डीजे विरोधात एकवटले आहेत. या आंदोलनाची हाक पुणेकर नागरिकांनी देत रविवारी जनप्रबोधन सभेचे आयोजन केले होते .त्याला पुणेकरांनी पाठिंबा देत ‘आम्ही हिंदू आहोत’ आमचा उत्सवांना विरोध नाही तर कर्णकर्कश आवाजाला विरोध आहे. आम्हीही संस्कृती वादी आहोत ,उत्सव पारंपारिक धार्मिक आणि शांततेच्या वातावरणात साजरे व्हावेत अशी भूमिका यावेळी पुणेकरांनी मांडली.










