विडी उद्योग जिल्ह्याबाहेर स्थलांतर होणार नाहीत/बंद होणार नाहीत — जिल्हा प्रशासनाच्या आवाहनास विडी उद्योग मालकांचा सकारात्मक प्रतिसाद
सोलापूर :- सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात विडी कामगारांना, शासन परिपत्रकान्वये किमान वेतन देणे बाबत महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीस जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, अप्पर कामगार आयुक्त पुणे विभाग अभय गीते, सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले, सरकारी कामगार अधिकारी जयदीप मगर तसेच विविध विडी कारखानदार मालक उपस्थित होते.
किमान वेतन अंमलबजावणीच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांनी नमूद केले की, किमान वेतन अंमलबजावणी करताना उद्भवणाऱ्या समस्यांबाबत उद्योजकांनी आपले म्हणणे लेखी निवेदनाद्वारे सादर करावे. तसेच कामगार संघटनांकडून त्यांच्या मागण्या/निवेदने घेतली जातील. दोन्ही पक्षांची बाजू शासन दरबारी योग्यरित्या मांडण्यात येईल, असे सांगण्यात आले.
दरम्यान अपर कामगार आयुक्त पुणे विभाग अभय गीते यांनी प्रकरण योग्य मार्गाने व सकारात्मक दृष्टीने सोडवण्यासाठी उद्योजकांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी विडी कारखानदारांच्या अडीअडचणी ऐकून घेण्यात आल्या. तसेच किमान वेतन बाबत वेळोवेळी प्राप्त शासन निर्देशान्वये प्रभावी अंमलबजावणी करण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे, सोलापूर जिल्हा सहाय्यक कामगार आयुक्त मंगेश झोले यांनी प्रतिपादन केले.
आजच्या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर, सोलापूर येथील कोणताही विडी उद्योग स्थलांतरित होणार नाही किंवा बंद होणार नाही, याबाबत मालक वर्ग सकारात्मक दृष्टीने विचार करत आहे. असे बैठकीस उपस्थित विडी उद्योजक मालक यांचेकडून सांगण्यात आले. कामगारांनी याबाबत इतर कोणत्याही अफवांवरती विश्वास ठेऊ नये, असेही त्यांनी प्रतिपादन केले.













