अमरावती : जिल्हा महिला रुग्णालयाच्या नवजात शिशु कक्षात लागलेल्या आगीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना अमरावतीत घडल्याचे समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हेंटिलेटरमध्ये अचानक झालेल्या स्फोटानंतर पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास ही आग लागली. डॉक्टर, परिचारिका आणि कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखल्यामुळे इतर अनेक बालकांचे प्राण वाचल्याची माहिती आहे.
याबद्दल बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले ,अमरावती येथील जिल्हा स्त्री रुग्णालयात काल रात्री लागलेल्या आगीत तीन बालकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय दुःखद आणि हृदयद्रावक आहे. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश आरोग्य प्रशासनाला देण्यात आले आहेत. या घटनेतील दोषींवर कठोरतील कठोर कारवाई करण्यात येईल. आरोग्य मंत्री आणि सचिव दोघांनाही आजच अमरावती येथे भेट देण्यास सांगण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत देण्यात येईल. जखमी बालकांवर उपचार शासकीय खर्चाने करण्याचे निर्देशही अमरावती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. सुदैवाने या घटनेत 36 बालकांना सुखरूप वाचवण्यात यश मिळाले.









